दिलीप कांबळे बिनडोक: प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र

दिलीप कांबळे बिनडोक: प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र

अहमदनगर: भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेंवर टीकास्त्र सोडलं. दिलीप कांबळे हे बिनडोक आहेत, अशी टीका त्यांनी केली. प्रकाश आंबेडकर अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षण, राफेल डील आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत भाष्य केलं. राज्याचे मंत्री दिलीप कांबळे यांनी टीका करताना, प्रकाश आंबेडकरांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचं म्हटलं होतं. त्याला प्रकाश आंबेडकरांनी उत्तर दिलं.

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रकाश आंबेडकरांना आघाडीत येण्यासाठी आग्रह धरला जात आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमला न सोडण्याची भूमिका घेतली आहे. त्यावरुन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत सहभागी होणार का, असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, आमच्या बारा जागांचे बारा वाजलेत.

एमआयएमला बरोबर घ्यायचे नाही असे ते म्हणत असेल, तर त्यांनी आम्हाला याबाबत अद्यापपर्यंत काही कळवले नाही. काही लेखी दिले नाही. त्यामुळे त्यावर बोलणे उचित होणार नाही, असं आंबेडकरांनी नमूद केलं. कोणाच्या आडून बोलण्यापेक्षा तुम्ही समोर बोला असा टोलाही त्यांनी यावेळी काँग्रेसला लगावला.

‘मनमोहन सिंहांनी राफेलवर बोलायला हवं होतं’

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राफेल व्यवहाराबाबत भाष्य केलं. राफेलबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींपेक्षा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग किंवा माजी संरक्षण मंत्री ए के अँटनी यांनी हा विषय मांडला असता, तर तो योग्यपद्धतीने मांडला गेला असता, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राफेल घोटाळ्याच्या मुद्यासंदर्भात काँग्रेससुद्धा बोटचेपी धोरण घेत आहे. वास्तविक पाहता हा मुद्दा राहुल गांधी यांनी मांडण्यापेक्षा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मांडला असता तर याची त्यांना माहिती देता आली असती, असं आंबेडकर म्हणाले.

मोदी सरकारच्या काळामध्ये जी विमाने घेतली गेली त्यांची गॅरेंटी आहे की नाही, त्यातील ज्या सोयी सुविधा आहेत, त्या कशाप्रकारच्या आहेत या बाबी कुठेही स्पष्ट होताना दिसत नाही. त्यामुळे फक्त किमतीच्या मुद्दा पुढे आला आहे, विमान हे शो पीस आहे की वापरणार ही आहेत, याचा अद्यापपर्यंत खुलासा झालेला नाही, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

मराठा समाजात फूट

मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे निवडणुकीच्या तोंडावर दिले असून त्यात सरकारचा स्वार्थी हेतू होता असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण अहवाल न्यायालयामध्ये सादर करुन, तो जाहीर केला पाहिजे, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.

काही मराठा समाज हा गांधीवाद सोडून वैदिक वादाकडे गेला आहे. तसेच जुन्या काळातील एक संघ मराठा समाज हा दिसून येत नाही. मराठा समाज दोन भागांमध्ये विखुरला गेला आहे, तर भाजप सरकारला आरक्षणाचा वाद हा सर्वत्रच पेटवायचा होता अशी टीका आंबेडकर यांनी केली.

शांतता ही फक्त वरवर दिसत आहे. मात्र आरक्षणावरून निर्माण झालेली कटुता निवडणुकीमधून बाहेर पडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ओबीसींमध्ये भीतीचं वातावरण

ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनाही आपल्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याची भावना आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना आरक्षण दिले आहे त्यांचे हक्क त्यांना राहिले पाहिजेत, असेही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

भीमा कोरेगावचा कार्यक्रम हा नियोजित वेळेनुसार असून, आपण त्या कार्यक्रमाला जाणार असल्याचेही आंबेडकर यांनी जाहीर केलं.

पाच कोटी द्या

रामदास आठवले यांनी लवकरच खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा होतील असे विधान केले होते. यावर आंबेडकरांनी 15 लाख रुपये देण्यापेक्षा आपल्याला पाच कोटी रुपये दिले तर किमान निवडणुकीचा खर्च निघेल असा टोला लगावला.

Published On - 3:21 pm, Fri, 21 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI