Pune Car Accident: अचानक बंद पडली कार, थेट 150 फूट खोल दरीत कोसळली, पाबे घाटात थरार…
Pune Car Pabe Ghat Accident: पुण्याच्या राजगड तालुक्यातील पाबे घाटात कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली. हडपसर येथून तोरणा किल्ला पाहण्यासाठी हे सर्व तिघे जण निघाले होते. पाबे घाटात आल्यानंतर चढला अचानक कार बंद पडली.पाऊस आणि निसरड्या रस्त्यामुळे कार घसरत दरीच्या दिशेने गेली. या घटनेने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.

Pune Car Pabe Ghat Accident: तोरणा किल्ला पाहण्यासाठी हडपसर येथून निघालेल्या पर्यटकांच्या कारचा पुण्याच्या राजगड तालुक्यातील पाबे घाटात भीषण अपघात झाला. घाट चढत असताना अचानक बंद पडलेली कार पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर घसरत थेट सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मागून येणाऱ्या पर्यटकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे कारमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
पाबे घाटात थरार
मोनीस अरविंद चव्हाडिया, रितिका सिंग आणि उमेश हे आज पहाटे हडपसर येथून तोरणा किल्ला पाहण्यासाठी कारने निघाले होते. सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास ते पाबे घाट चढत असताना त्यांची कार अचानक बंद पडली. कार पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पाऊस आणि रस्ता ओलसर असल्यामुळे कार घसरू लागली. काही क्षणांतच चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल दरीत कोसळली.
पर्यटकांच्या समयसूचकतेने वाचले प्राण
माहितीनुसार हडपसर येथून तोरणा किल्ला पाहण्यासाठी हे सर्व तिघे जण निघाले होते. पाबे घाटात आल्यानंतर चढला अचानक कार बंद पडली..पाऊस आणि ओलसर रस्त्यामुळे कार घसरत दरीच्या दिशेने गेली आणि कार सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळली. अपघातानंतर मागून येणाऱ्या काही पर्यटकांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी धाव घेतली. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचेपर्यंत या पर्यटकांनी त्यांच्याकडील दोरीच्या मदतीने कारमधील प्रवाशांना बाहेर काढले आणि सुरक्षित ठिकाणी आणले.
त्यानंतर तानाजी भोसले, त्याने सपकाळ, संदीप सोळसकर आणि दिलीप तळेकर यांच्या रेस्क्यू टीमने मदतकार्य केले. अपघातातील तिघांना पुढील उपचारासाठी वेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुणे शहरात पाठवण्यात आले. पावसाळी वातावरणात घाटरस्त्यांवर वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याची गरज या अपघातातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. तसेच, संकटाच्या वेळी मदतीला धावून आलेल्या पर्यटकांच्या तत्परतेचेही कौतुक होत आहे.