उद्या मला काही केलं तर… प्रसिद्ध नृत्यांगना सायली पाटीलला धमक्या; कलाकार हादरले
प्रसिद्ध नृत्यांगना सायली पाटीलला बीड येथील कार्यक्रमात निकृष्ट जेवण दिल्याच्या तक्रारीनंतर गंभीर धमक्या मिळत आहेत. आयोजकांनी 'कार्यक्रम उधळून लावू, पुण्यात फिरू देणार नाही' अशा धमक्या दिल्याने तिने पुणे पोलिसांकडे तक्रार केली आहे. सायलीने पोलीस संरक्षणाची मागणी केली असून, तिच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

सुप्रसिद्ध नृत्यांगना सायली पाटीलला धमक्या आल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील वडझरी गावातील आयोजकाने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याबद्दल तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आयोजकांकडून तिला धमक्या दिल्या जात आहेत. तुझा कार्यक्रम उधळून लावू, तुला पुण्यात फिरू देणार नाही, अशा धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार सायली पाटीलने पुणे शहर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस संरक्षणाची मागणी देखील तिने केली आहे.
सायली पाटीलने झालेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. 15 ऑक्टोबर रोजी नवरात्रीत माझा बीडच्या वडझरीत कार्यक्रम होता. नवरात्रीत आपल्या दारात भिकारी आला तरी आपण त्याला जेवण देतो. फराळ देतो. देवी कुणाच्या रुपात येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे आपण दानधर्म करत असतो. आम्ही तर कलाकार आहोत. आमची फार अपेक्षा नव्हती. निदान चांगलं जेवण मिळावं एवढंच म्हणणं होतं. सायली पाटील उगाच चिडत नाही. चार वर्ष आम्ही शो करतो. आमचे 95 टक्के शेतकऱ्यांसाठीचे असतात. पण वडझरीत ज्या पद्धतीने आम्हाला वागणूक दिली. तसं मला कोणी कधी ट्रिट केलं नाही. मी जेवणाला नाव ठेवत नाही. मीही शेतकऱ्याची मुलगी आहे. पण जेवणालाही दर्जा असावा. तुम्ही कुणाला जेवण देता, कसं देताय, हे समजलं पाहिजे, असं सायली पाटील म्हणाली.
अंघोळीच्या पातेल्यात पोहे
वडझरी येथे शो होता. तिथेच मागच्यावर्षीही आम्ही नवरात्रीत शो केला होता. मागच्यावर्षीही जेवणाची गैरसोय होती. यावर्षीही तेच केलं. मला राग आला. मी जेवले नाही. 17-18 कलाकार घेऊन आम्ही तडक निघालो. टपरीवर आम्ही मॅगी खाल्ली. तीन तास आम्ही प्रवास करून आलो होतो. खरंतर वडझरीत यावर्षीही शो द्यायचा नव्हता. पण आयोजक मागे लागले. त्यांना आम्ही सांगितलं आम्हाला जेवण नीट द्या. मागच्या वर्षी जेवण व्यवस्था केली नाही. मला वाटलं देतील. नवरात्र असल्याने आमच्या काही कलाकारांचे उपवास होते. त्यांच्यासाठी चहा आणि इतरांसाठी पोहे द्या एवढीच माफक अपेक्षा होती. पण त्यांनी अंघोळीच्या पातेल्यात पोहे दिले. कुणाला खाऊ वाटेल का हे पोहे? असा सवाल सायलीने केला.
सायली आली नाही तर…
अंघोळीच्या पातेल्यात पोहे दिले ते मला खटकलं. तुम्ही तरी खाल का? आम्ही पोहे न खाताच शोला गेलो. आल्यावर पाहिलं तर जेवण उघडं होतं. जेवणाला नाव ठेवत नाही. पण ते योग्य प्रकारे दिले पाहिजे. मला राग आला. कलाकारांना ट्रिट व्यवस्थित केलं नाही म्हणून मी त्यावर व्हिडीओ केला होता. वडझरीत परत कधी येणार नाही, असं मी त्या व्हिडीओत म्हटलं. व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर मला आयोजकाचा फोन आला. तुम्ही व्हिडीओ डीलिट करा नाही तर आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू. कराडला तुमचा शो आहे, तिथे 20-25 लोकं पाठवून शो बंद करू, अशा धमक्या दिल्या. एकाने तर सायलीला गावात यावं लागेल. माझ्या मुलीच्या वाढदिवसाला सायली नाही आली तर मी मुलीला मारून टाकेन. सायलीला पुण्यात फिरू देणार नाही, अशी धमकी मला दिली. आम्हाला धमक्यांचे फोन येत आहेत. आम्ही फक्त दोनच फोन उचलले, असं तिने सांगितलं.
मला गावाची बदनामी करायची नाही
मला गावाची बदनामी करायची नव्हती. गावकरी चुकले. तुमच्याकडे पाहुणे आले तर त्यांना असं जेवण द्याल का? आम्ही गुन्हा दाखल केला आहे. पोलीस संरक्षण घेतल्याशिवाय मी कुठेही फिरणार नाही. उद्या मला काय केलं तर सांगू शकत नाही, अशी भीती तिने व्यक्त केली.