Pune Ganeshotsav: पुण्यातील गणेशोत्सव डीजे प्रकरणात मोठे पाऊल, थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार
Pune Ganeshotsav: पुण्यातील गणेशोत्सवात डीजेच्या आवाजावरून आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापर्यंत वाद पोहोचला आहे. गणेशोत्सवाच्या वेळी लावण्यात येणाऱ्या डीजेमुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्यामुळे ही तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे करण्यात आली आहे.

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि भावनिक सण आहे. भाविक गणपती बाप्पाला घरी किंवा सार्वजनिक मंडळांमध्ये आणून दहा दिवस भक्तिभावाने पूजा करतात, आरती करतात आणि शेवटी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. मात्र गेल्या काही वर्षांत या उत्सवात डीजे आणि मोठ्या ध्वनिवर्धकांचा वापर वाढल्याने ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुण्यातही याच मुद्द्यावरून दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. एकीकडे उत्सवाचा आनंद वाढवण्यासाठी डीजे हवा असा युक्तिवाद होतो, तर दुसरीकडे कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि शांततेवर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार केली जाते.
ध्वनी प्रदूषणाबाबत आयोगाकडे तक्रार
याच पार्श्वभूमीवर विद्यानंद बापट यांनी डीजेच्या आवाजाविरोधात आवाज उठवल्यानंतर आता एका पुणेकराने हा प्रश्न थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (NHRC) दारात नेला आहे. डेक्कन जिमखाना परिसरात राहणारे शरद केळकर यांनी पुण्यातील ध्वनी प्रदूषणाबाबत आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
प्रशासनावरही दबाव
आयोग केवळ नोटीस बजावून थांबलेला नाही. मागील वर्षभरात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कोणती कारवाई करण्यात आली, यंदाच्या गणेशोत्सवात कोणत्या मंडळांना ध्वनिवर्धक किंवा डीजे वापरण्यास परवानगी देण्यात येणार आहे आणि या संदर्भातील संपूर्ण अहवाल सात दिवसांच्या आत सादर करावा, असे स्पष्ट निर्देश आयोगाने दिले आहेत. यामुळे प्रशासनावरही दबाव निर्माण झाला आहे.
पुढील कारवाई होणार का? याकडे लक्ष
गणेशोत्सव हा आनंदाचा सण असला तरी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होऊ नये, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. शरद केळकर यांच्या तक्रारीमुळे आता ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्याकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाईल, अशी अपेक्षा आहे. आयोगाच्या निर्देशांनुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.