350 कोटींच्या कथित भ्रष्टाचाराचा दावा, दूध संघाच्या आरोपांवरून वाद; शिंदेंचं पाटलांना थेट आव्हान, म्हणाले…
Vitthal Sugar Factory: विठ्ठल कारखान्याच्या कथित 350 कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, अशी रणजितसिंह शिंदे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहेत.

सोलापूरच्या स्थानिक राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार अभिजीत पाटलांवर भाजपच्या रणजितसिंह शिंदे यांनी गंभीर आरोप केले आहेत. विठ्ठल सहकारी कारखान्यात 350 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. तुळशी गावातील पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवणार आहे. त्यासाठी सव्वा कोटीचा निधी लवकरच मंजूर होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
रणजितसिंह शिंदे म्हणाले की, मागील अनेक दिवसात काही लोकांनी जिल्हा दूध संघाबाबत बेछूट आरोप केले. जिल्हा दूध संघाच्या जागा विक्री केल्याचा देखील आरोप करण्यात आला. मात्र जिल्हा दूध संघाने परस्पर कोणत्याही जागा विकल्या नाहीत. ज्या जागा विक्री केल्या त्या राज्य शासनाच्या नियमात राहून, परवानगी घेऊन जागा विक्री केल्या. जी जागा विक्री केली ती पंढरपूर दूध संघाची केली. टेम्भूर्णी किंवा नवी मुंबईची जागा विक्री केलेली नाही, असं ते म्हणाले आहेत.
ते म्हणाले की, सोलापूर दूध संघ DRT कोर्टात HDfC बँकेविरोधात लढत आहे. त्या बँकेने या दोन्ही जागा विक्री केल्या आहेत. काही बहाद्दर लोक स्वतःच्या कारखान्यातील 350 कोटीच्या चोऱ्या लपवण्यासाठी दूध संघावर आरोप करत आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्यात साडेतीनशे कोटी रुपये भ्रष्टाचार झाला आहे. त्याचे पुरावे आम्ही लवकरच देऊ. कर्मचाऱ्यांच्या नावावर 40 कोटी दाखवले. मात्र प्रत्यक्षात 5 कोटी दिले, ज्यांचे पेट्रोलपंप नाहीत त्यांना 2 कोटीचे बिलाचे चेक दिले, असे धक्कादायक आरोपी शिंदेंनी केले आहेत.
ते पुढे म्हणाले की, अभिजीत पाटलांना आव्हान आहे की, त्यांनी दूध संघाची चौकशी लावावी आम्ही कारखान्याची चौकशी लावतो. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सखोल चौकशी करावी, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत. विठ्ठल कारखान्याने जे कर्ज काढले ते चुकीच्या पद्धतीने हडप केले. हा बहाद्दर रात्रीत जाऊन मुख्यमंत्र्यांचे पाय धरतो, कधी दुसरीकडे जातो कधी तिसरीकडे जातो. आपण स्वतःचे बघावे मग लोकांची मापे काढावीत.
तुळशी गाव विकणे आहे, असे बॅनर समोर आले होते. यावर बोलताना रणजितसिंह शिंदे म्हणाले की, तुळशी गावाचा समावेश तत्कालीन आमदार बबनदादा शिंदे यांनी करुन घेतला होता. त्याबाबत साडेतीनशे कोटीची सुप्रमा झाली आहे. ती मंजूर झाली की तुळशी गावच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. झेडपी निवडणुकीवेळी तुळशी गावाला 86 लाख मंजूर केले मात्र त्याची रक्कम वाढून 1 कोटी 25 लाखावर गेली. पालकमंत्र्यांनी त्याला मंजुरीचे आदेश दिलेत लवकरच तो प्रश्न सुटेल. यातून 1 तलाव आणि 2 ओढ्याना पाणी देण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात येईल.