‘अवनी’ला ठार करताना नियमांचं उल्लंघन, चौकशी अहवालात ठपका

  • Namdev Anjana
  • Published On - 10:55 AM, 6 Dec 2018
'अवनी'ला ठार करताना नियमांचं उल्लंघन, चौकशी अहवालात ठपका

यवतमाळ : नरभक्षक T1 (अवनी) वाघिणीला ठार केल्याप्रकरणी तीन नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे, असा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने ठेवला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने चौकशी करुन अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक मिश्रा यांच्याकडे सुपूर्द केला. आर्म अॅक्ट 1958, इंडियन वेटर्नरी कौन्सिल अॅक्ट, वन्यजीव रक्षक कायदा 1972 आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या गाईडलाईनचा भंग करण्यात आलं असल्याचे अहवालात म्हटले आहे.

अहवालातील काही महत्त्वाचे मुद्दे जसेच्या तसे :

वाघिणीचा खात्मा

टी-1 (अवनी) या वाघिणीने 13 जणांचा जीव घेतल्याचे बोलले जाते. त्यामुळे या नरभक्षक वाघिणीचा खात्मा करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आणि तिला 2 नोव्हेंबर रोजी अखेर ठार करण्यात आले. शार्प शूटर अजगर अलीने 2 नोव्हेंबरच्या रात्री एक वाजण्याच्या सुमारास टी-1 वाघिणीला अचूक टिपत तिला गतप्राण केलं. टी-वाघिणीचा खात्मा होताच, गेल्या अनेक दिवसांपासून भयभीत अवस्थेत जगणाऱ्या यवतमाळच्या राळेगावातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडत एकच जल्लोष केला.

राजकारण तापलं

वाघिणीला मारल्यानंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अडचणीत आले आहेत. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही मुनगंटीवारांवर टीका केली आहे. शिवाय राज्यातील सर्वच पक्षांनी वाघिणीला मारण्याऐवजी पकडण्याचा प्रयत्न का केला नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.

इटालियन श्वान ते गजराजवाघिणीच्या खात्म्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा

भारताचे प्रसिद्ध गोल्फर ज्योती रंधावा हे सुद्धा त्यांचे प्रत्येकी सहा लाख किमतीचे केन कोर्स जातीचे दोन इटालियन श्वान घेऊन या भागात वाघीण जेरबंद करण्याच्या दृष्टीने दाखल झाले होते. मात्र, ते अयशस्वी ठरल्याने त्यांना परत पाठवण्यात आले. त्यानंतर मध्यप्रदेशातील कान्हा आणि महाराष्ट्रातील ताडोबामधून हत्तींनाही आणण्यात आले होते.

पवनपुत्र, विजय, हिमालय आणि शिवा, असे चार हत्ती मध्य प्रदेशातील कान्हा जंगलातून आणण्यात आले होते. हे चारही हत्ती भाऊ होते. एखाद्या वाघाला घेरुन त्याला जेरबंद करण्यात हे चार हत्ती पटाईत मानले जायचे. मात्र वाघीण हाती लागण्याच्या आतच या चार हत्तींची घरवापसी करण्यात आली. या हत्तींच्या घरवापसीला कारण ताडोबातील गजराज ठरला. गजराज साखळी तोडून पळाला आणि परिसरात नासधूस केली. शिवाय यात महिलेचा जीव गेला होता. त्यामुळे गजराजसह इतर चारह हत्तींनाही परत पाठवण्यात आलं होतं.

अवनीला वाचवण्यासाठी मोहीम

जवळपास 47 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील जंगलात ‘T1’ या नरभक्षक वाघिणीचा शोध घेतला जात होता. या वाघिणीचा अखेर खात्मा करण्यात यश आलं. मात्र, ‘T1’ वाघिणीसाठी गेल्या काही दिवसांपासून प्राणीप्रेमींनी सोशल मीडियावर मोहीम राबवली होती. ‘अवनी’ असे या नरभक्षक वाघिणीला नाव देत, तिच्यासाठी राजकीय नेत्यांपासून अगदी बॉलिवूड कलाकारांपर्यंत सगळ्यांनीच अवनीला वाचवण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला होता