रोहित पवारांनी फोडला नवा बॉम्ब; समोर आणला निवडणूक आयोगाचा गलथान कारभार? पोस्ट करत पुरावाच दिला
Rohit pawar : रोहित पवारांनी नवा बॉम्ब फोडला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाचा गलथान कारभार समोर आणालाय. या कारभारावरून त्यांनी पोस्ट करत टीका केली.

उत्तर प्रदेशातूनही मतदारयादीचा घोळ समोर आला आहे. उत्तर प्रदेशात मतदारांच्या नावाचा मोठा घोळ उघडकीस झालाय. मूर्ख , बीकॉम…अशी चुकीचे नावे मतदार यादीत पाहायला मिळत आहे. या प्रकारानंतर विरोधकांनी एकच संताप व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनीही निवडणूक आयोगाच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. एवढा गलथान कारभार ज्ञानेश कुमार यांनाच शोभतो, अशा शब्दात रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं की, उत्तरप्रदेशमधील इलाहाबाद-झासी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत समोर आलेला निवडणूक आयोगाचा धक्कादायक अजबगजब कारभार.. मतदाराचं नांव – राम ने यादव को मारा… वडिलांचं नांव – मूर्ख चंद्र यादव…एका मतदाराच्या वडिलांचं नाव – BCom… मतदाराचं नाव – अफजल अहमद.. वडिलांचं नाव – मोहम्मद इक्बाल भीक मांगते है…मतदाराचं नांव – टक्कर मारना, वडिलांचं नांव – टक्कर मारना..’.
‘हा गलथान कारभार नाही का? आणि एवढा गलथानपणा केवळ ज्ञानेशकुमार यांनाच शोभतो! SIR मधील घोळ आणि निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराबद्दल परवा घेतलेल्या पत्रकार परिषदेत आम्ही जे मुद्दे मांडले त्यावर उत्तरप्रदेशमध्ये समोर आलेल्या घटनांनी शिक्कामोर्तबच झालं. निवडणूक आयोगाचा अघोषित प्रवक्ता असलेल्या भाजपने यावर उत्तर द्यावं, असं रोहित पवार यांनी म्हटलं. आता आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भारतीय जनता पक्षाचे नेते काय प्रत्युत्तर देतं, हे पाहावे लागेल.
नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेशातील मतदारयाद्यांमध्येही चुका आढळून आल्या आहेत. या राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. यावरून जाब विचारल्यानंतर सॉफ्टवेअरमधील त्रुटींवरून चुका घडल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलं. मतदारयादीत रामहित यादव यांच्या नावाच्या जागी राम ने यादव को मारा…असे नाव नमूद आहे. तर काही मतदारांच्या वडिलांच्या नावाऐवजी ‘बी. कॉम’ असे लिहिलं आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विधान परिषद निवडणुकीसाठी प्रथमच ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आल्याने चुका घडल्याचे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.