Rohit Pawar: एकनाथ शिंदेजी, तुम्ही नाराज व्हा… रोहित पवार असं का म्हणाले?

Rohit Pawar: राज्य सरकारच्या धोरणांवरून आणि वाढत्या महागाईवरून शरद पवार गटाचे नेते रोहित पवार अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे. राजकीय कारणांवरून दिल्लीला जाण्याऐवजी, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरून आणि महागाईवरून नाराज होऊन आवाज उठवा, असा चिमटा रोहित पवारांनी शिंदे यांना काढला आहे.

Rohit Pawar: एकनाथ शिंदेजी, तुम्ही नाराज व्हा... रोहित पवार असं का म्हणाले?
Rohit Pawar
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 25, 2026 | 4:38 PM

राज्य सरकारच्या धोरणांवर आणि वाढत्या महागाईवरून राज्य सरकारवर टीका करणारे शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आता अधिक आक्रमक झाले आहेत. महागाईच्या मुद्द्यावरून त्यांनी आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांच्यावरच टीका केली आहे. एकनाथ शिंदेजी तुम्ही सतत काही ना काही कारणाने नाराज होता आणि दिल्लीला जाता. एकदा महागाईच्या मुद्द्यावरून नाराज व्हाच, असा चिमटा रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना काढला आहे. त्यावर आता एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रोहित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत. मी त्यांना सांगेन की, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. आता तुम्ही नाराज व्हा. इलेक्श्न आले की तुम्ही दिल्लीला जाता, इलेक्शन्स आले की तुम्ही नाराज होता. तेव्हा आता महागाई वाढली आहे. त्यावरही तुम्ही नाराज व्हाल अशी आशा आहे, असा चिमटा काढतानाच सत्तेतील लोकांना पैसा आणि सत्ता याशिवाय काही दिसत नाही, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.

महागाई विरोधात आंदोलन

शरद पवार गटाच्या झालेल्या बैठकीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्या बैठकीत महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे यावर चर्चा झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीत काय करता येईल? यावर चर्चा झाली. चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली. पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर चर्चा करत आंदोलन करण्याचा निर्णय झालाय, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

जमाव बंदी जुमानणार नाही

पुण्यात टॅंकर माफिया मोठ्या प्रमाणात आहे. त्याविरोधत लोक रस्त्यावर उतरणार होते. तीन तीन खून एका दिवसात होत आहेत. पेट्रोल डिझेलवर आंदोलन होत आहे. जमावबंदी लोकांच्या हितासाठी नाही. आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले तर आम्ही तुमची जमावबंदी जुमानणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

टोमणाच मारला असेल

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मोठा नेता जेव्हा परदेशात जातो तेव्हा तो तिथे काय काय करतो हे बघितले पाहिजे. पवार साहेब बोलताना यूएईबद्दल बोलत असतील. एका देशाशी चांगला संवाद झाला पण इतर चार देशांचे काय? पवार साहेबांनी मोदींना टोमणांच मारला असेल, असंही ते म्हणाले.

नव्या लोकांना सत्ता द्या

विधान परिषदेच्या निवडणुकीत होणाऱ्या घोडेबाजारावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. एका एका मतांसाठी एका एका पदासाठी 100 कोटीपेक्षा जास्त दर रेट ठेवला जाईल असे दिसत आहे. महायुतीकडून भरपूर पैसा वाटला जाईल, असे दिसतेय. नगरसेवकांना असे फोडले जात असेल तर मी लोकांना आवाहन करेल की त्यांनी व्यवहारीक लोकांना बसविण्यापेक्षा नव्या लोकांना सत्तेत आणा, असं आवाहन त्यांनी केलं.

तटकरेंनी मुलासाठी…

सुनिल तटकरे यांनी स्वत:चा मुलासाठी लॅाबिंग सुरू केले आहे. ज्या जागा अजित पवार लढत होते, त्या कायम ठेवल्या पाहीजे. स्वत:च्या खासदारकीसाठी आणि मुलासाठी ही आमदारकी पदरात पाडून घ्यायची गरज नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

Follow Us