Sanjay Raut : लाडकी बहिण योजनेसंदर्भात संजय राऊत सरकारला कायदेशीर नोटिस पाठवणार, स्टेट कॅप्चर त्यांनी म्हटलं ते काय

Sanjay Raut : लाडकी बहिण योजना जाहीर झाली तेव्हापासून ती चर्चेत आहे. निवडणूक संपल्यानंतर सरकारने तब्बल 92 लाख महिलांची नावं या योजनेतून वगळली आहेत. संजय राऊत हे या प्रकरणात आता सरकारलाच कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत.

Sanjay Raut : लाडकी बहिण योजनेसंदर्भात संजय राऊत सरकारला कायदेशीर नोटिस पाठवणार, स्टेट कॅप्चर त्यांनी म्हटलं ते काय
Sanjay Raut
| Updated on: Jul 14, 2026 | 11:03 AM

लाडकी बहिण योजनेतून 92 लाख महिलांची नाव वगळ्यात आली आहेत. त्यावरुन संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सरकारला ते यासाठी नोटीस पाठवणार आहेत. 92 लाख महिलांची नावं वगळली. 14 हजार कोटी रुपये लाडकी बहिण योजनेतून वितरित करण्यात आले. “हे 92 लाख बोगस लाभार्थी आहेत. बेकायदेशीरपणे केवायसी न करता छाननी न करता 29 हजार पुरुष आणि 4500 सरकारी कर्मचारी असे साधारणत: 3515 कोटी रुपये अशा पद्धतीने उधळले गेले. फडणवीस आणि मिंधे यांनी मतं विकत घेण्यासाठी सरकारी पैशांचा हा अपहार केला. हा गुन्हा म्हणजे राम मंदिर दानपेटी लुटणं तसं जनतेची तिजोरी लुटण्यासारखा आहे. 3515 कोटींची वसुली कशी करणार हा मोठा प्रश्न आहे” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

“बँकेत 5 हजाराचा फ्रॉड झाला की अटक करता. मग मेहुल चोकसी, विजय मल्ल्या का पळून गेले. त्यांनी बँकेच्या पैशांचा अपहार केला. 3515 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून बेकायदेशीरपणे मतं विकत घेण्यासाठी वापरले. हा या शतकाला सगळ्यात मोठा अपहार आहे” असा दावा संजय राऊत यांनी केला. “पैसे वसूल कसे करणार?. 92 लाख लोक वगळले म्हणून इथे तुम्हाला गप्प बसता येणार नाही” असं संजय राऊत म्हणाले. “92 लाख लोकांना ज्यांच्या सहीने पैसे मिळाले, तेव्हाच्या एकनाथ शिंदे कॅबिनेटच्या सरकारवर पैशाच्या अपहाराचा गुन्हा दाखल झाला पाहिजे” अशी मागणी राऊत यांनी केली.

असे प्रकार रशिया, दक्षिण आफ्रिकेत झालेत

“तेव्हाचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, बाल कल्याण सचिव यांची व्यक्तीगत संपत्ती जप्त करुन पैशांची वसुली झाली पाहिजे. परदेशात याला स्टेट कॅप्चर म्हणतात. असे प्रकार रशिया, दक्षिण आफ्रिकेत झालेत. युगांडामध्ये ईदी अमीनने अशा प्रकारचा गुन्हा केलाय. बेकायदेशीरपणे राज्य विकत घेणं म्हणतात याला. आम्ही सरकारला कायदेशीर नोटीस पाठवणार. वेळ पडली तर हायकोर्टात जाणार. आमच्याकडून लवकरच एक नोटीस मुख्यमंत्री, मुख्य सचिवांना जाईल. कायदेशीर नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे” असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी हा विषय लावून धरण्याचे संकेत दिलेत.

Follow Us