Santosh Chavan : वडिलांवर हात उचलणारा ते बापटांवर हल्ला करणारा गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष; संतोष चव्हाणची कुंडली आली समोर
बापटांवर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणची गुन्हेगारी कुंडली आली समोर आली आहे. या संतोषने स्वत:च्या बापावर देखील हात उचलला होता.

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान डीजे बंदीच्या मागणीवरून वातावरण तापलं आहे. सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवात डीजे वाजवण्याला विरोध केला. त्यानंतर अनेक पुणेकरांनी त्यांना साथ दिली आहे. परंतु डीजेबंदीच्या मागणीला गणेश मंडळाने कडाडून विरोध केलाय. तर काल गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष संतोष चव्हाण याने विद्यानंद बापट यांना मारहाण केली. बापट यांना मारहाण करणाऱ्या संतोष चव्हाणच्या गुन्ह्यांची संपूर्ण कुंडली समोर आली आहे.
पुण्याच्या कोथरूडमधील राऊतवाडी परिसरात राहणारा संतोष चव्हाण याने कॉमर्स शाखेची पदवी पूर्ण केली आहे. तो टिंबर मार्केटमधील एका दुकानात काम करत असल्याची माहिती मिळतेय. पदवीचं शिक्षण घेऊनही तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघड झालं आहे. या संतोषने स्वत:च्या जन्मदात्या बापालाही मारहाण केली होती. त्याने बापाला बेदम मारहाण केल्यानंतर वडिलांनी त्याच्याशी नाते तोडून टाकले होते. त्याच्याविरोधात पुण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. कट रचणे, प्राणघातक हल्ला करणे आणि मारामारी करण्यासारखे 5 ते 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने बापट यांच्यावर हल्ला केल्यानंतर मोबाईल बंद करून पळ काढला होता. परंतु पोलिसांनी अवघ्या 3 तासांत संतोषला बेड्या ठोकल्या.
संतोष चव्हाण याने विद्यानंद बापटवर केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या मारहाणीचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केल्याचा दावा करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी आरोपी संतोष चव्हाणवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. त्याने विद्यानंद बापट यांच्या डिजे आणि साऊडं सिस्टिमविरोधातील भूमिकेवरून चिडून कृत्य केल्याचे समोर आलं आहे.
बापट यांना मारहाण केल्यानंतर संतोष चव्हाण म्हणाला होता की, बापट सातत्याने टीका करत आहे. आता त्याला आणखी मारला पाहिजे. पुण्यातील गणेशोत्सवबाबत जो कोणी बोलेल, त्याच्याही अशाच कानाखाली मारणार’. त्याचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याने म्हटलं होतं की, पुण्यात हजारो गणेश मंडळांकडून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे अनेकांच्या घरातील चूल पेटते’. दरम्यान प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असलेल्या संतोषने बापट यांना मारहाण केल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला होता. त्याने स्वत:चा मोबाइल बंद ठेवला होता. परंतु पोलिसांनी शोधमोहिम करून तीन तासांत संतोष चव्हाणला बेड्या ठोकल्या.