गोकुळच्या निकालानंतर सतेज पाटील यांनी पहिली मोठी प्रतिक्रिया म्हणाले, देवाची भीती घालून..
गोकुळच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा होत्या. त्यातच महायुतीला धक्का देणारा निकाल पुढे आला. सतेज पाटलांनी सर्व महायुतीच्या नेत्यांना पाणी पाजलं. त्यातच आता सतेज पाटलांनी अत्यंत मोठी प्रतिक्रिया दिली.

कोल्हापुरातील गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीत ऐन वेळी मोठा ट्विस्ट आला. मतमोजणीच्या सुरुवातीला सतेज पाटील यांचे पॅनेल आघाडीवर होते. बड्या बड्या राजकीय नेत्यांना सतेज पाटलांनी पाणी पाजले. अगोदर त्यांचे उमेदवार एकूण 15 जागांवर आघाडीवर होते. पण निकालानुसार त्यांच्या पॅनेलच्या एकूण 13 जागांवर विजय झाला आहे. दुसरीकडे महायुतीचे समर्थन असलेल्या 12 उमेदवरांचा विजय झाला. या मतमोजणीदरम्यान अनेक घडामोडी बघायला मिळाल्या. राज्याच्या नजरा या निवडणुकीकडे लागल्या होत्या. हसन मुश्रीफ यांनी आपला पराभव मान्य केला. दिलेला काैल मी मान्य करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. धक्कादायक म्हणजे त्यांच्या मुलाचाही या निवडणुकीत पराभव झाला. शेवटच्या क्षणी निकाल जाहिर होण्यापूर्वी स्वत: सतेज पाटील हे मतमोजणी केंद्रावर पोहोचले होते. आता या निवडणुकीनंतर सतेज पाटील यांनी अत्यंत मोठे विधान केले.
tv9 मराठीसोबत बोलताना सतेज पाटील यांनी म्हटले की, मुळात कोल्हापूरचा तुम्ही अभ्यास केला तर कोल्हापूरची मातीही स्वाभिमानाची आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी हा आर्थिक दृष्टिने स्वावलंबी आहे. आमच्या या जिल्ह्यात संध्याकाळी सभा घ्यायची झाली तर तुम्हाला कोणी मिळणार नाही. कारण दुधाची वेळ असते. एवढा हा जिल्हा स्वाभिमानी आहे. या स्वाभिमानी जिल्ह्याला कुठेतरी बांधून ठेवायचे हे जिल्ह्याला पटले नाही. लोकांना ते मान्यच नाही.
गोकुळ कोल्हापूरची अस्मिता मतदारांनी दाखवून दिली. गोकुळमध्ये शपथांचा परिणाम झाला नाही, हे निकालावरून स्पष्ट झाले. आज राज्यात दुष्काळ आहे आणि या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सहलीला घेऊन जाणे हे अत्यंत चुकीचे होतं. त्याच्यापुढे जाऊन देवाची भीती घालून शपथा देणं, हे देखील चुकीचे होतंय. आम्ही जर 25-30 वर्ष राजकारणात आहोत, लाढ्या काढ्या घालल्या. मग तुम्ही गोकुळला आम्हालाच मतदान करणार याच्या शपथा का खाताय?
म्हणजे आज त्या प्रत्येक नेत्याच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा गेलेला आहे. तुम्ही नेते एकत्र आला… लोकशाही किती मजबूत आहे हे याचे चित्र आहे. कारण शिक्के मारताना लोक बघून शिक्के मारतात. तुम्हीच का म्हणत लोकांच्यामध्ये उद्रेक झाला. नवीन लोकांना संधी देणे आवश्यक होते. शेवटी कसे आहे बघा… दूध उत्पादक हाच गोकुळचा बाप आहे. दुसरा कोणी गोकुळचा बाप नाहीये. जो शेतकरी आहे, शेणात काम करतो आमच्या माता भगनी याच खऱ्या गोकुळचा बाप आहेत.