Prajakt Tanpure : शरद पवारांची इतक्या वर्षाची साथ सोडताना भावूक झालेले प्राजक्त तनपुरे बोलले, ‘माझी त्यांच्याशी..’

Prajakt Tanpure : "मला मंत्री बनायची इच्छा नाही. माझा नुकताच भाजप प्रवेश होतोय, मला चण्याच्या झाडावर नका चढवू" असं ते म्हणाले. शरद पवार यांच्या पक्षाचा बडा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. खरंतर शरद पवारांनी या नेत्याला पोटनिवडणुकीत उमेदवारी सुद्धा देऊ केलेली.

Prajakt Tanpure :  शरद पवारांची इतक्या वर्षाची साथ सोडताना भावूक झालेले प्राजक्त तनपुरे बोलले, माझी त्यांच्याशी..
Sharad Pawar-Prajakt Tanpure
| Updated on: May 30, 2026 | 1:38 PM

“आज मी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत आहे, विधान परिषदेवर माझी वर्णी लागेल अशी मला अपेक्षा आहे. सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतलाय. जयंत पाटील आणि शरद पवार यांच्याशी बोलण्याची माझी हिंम्मत झाली नाही. मी सुप्रिया सुळेंकडे माझी आपबिती मांडलीये” असं प्राजक्त तनपुरे म्हणाले. “भाजपमध्ये जाण्याचा माझा हा निर्णय सोप्पा नव्हता. अजूनही राष्ट्रवादी सोडल्याचे शल्य आहेच. भाजपवासी झालोय यामागे काही कारणे आहेत” असं तनपुरे म्हणाले. जयंत पाटील यांच्याकडे मी माझी व्यथा मांडली होती असं त्यांनी सांगितलं. “ईडीच्या भितीपोटी मी भाजपमध्ये चाललो नाहीये. जी नोटीस आमच्या कारखान्याला आली होती ती नील झालीय. तो विषयच राहीला नाही, त्यामुळे मी भितीपोटी हा निर्णय घेतला घेतलाय अशातला भाग मुळीच नाही” हे प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलं.

“मला मंत्री बनायची इच्छा नाही. माझा नुकताच भाजप प्रवेश होतोय, मला चण्याच्या झाडावर नका चढवू” असं ते म्हणाले. याआधी प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी पोटनिवडणुकीतून भाजपसाठी माघार घेतली होती. तेव्हापासूनच ते भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगलेल्या. राहुरी पोट निवडणुकीत प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार असल्याचं आधी बोललं जात होते. मात्र प्राजक्त तनपुरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक फोन केला, त्यानंतर त्यांनी माघार घेतली. राहुरी पोटनिवडणुकीत त्यांनी दिवंगत भाजप आमदार शिवाजीराव कार्डिले यांचे पुत्र अक्षय कार्डिले यांना पाठिंबा दिला. त्यामुळे अक्षय कार्डिले यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.

प्राजक्त तनपुरे यांचं वर्चस्व कुठे?

प्राजक्त यांनी अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या माघारीमुळे शरद पवार यांना राहुरीमधून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी द्यावी लागलेली.राहुरी तालुक्यातील नगरपालिका, बाजार समिती, साखर कारखाना अशा प्रमुख संस्थांवर प्राजक्त तनपुरे यांचं वर्चस्व आहे. तनपुरे कुटुंबाला राहुरीमध्ये मान,सन्मान आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने भाजपचं बळ वाढणार आहे.

Follow Us