कमरेला चावी, हातात घड्याळ, फुशारकी मारणाऱ्या तरुणावर पवारांची प्रश्नांची सरबत्ती

  • रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर
  • Published On - 12:58 PM, 30 Apr 2019

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुष्काळ दौऱ्यावर आहेत. काल मुंबईत मतदान केल्यानंतर शरद पवार थेट सोलापूरला रवाना झाले. त्यांनी आज सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील चारा छावणीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान एक अजब किस्सा घडला.

शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना, एक तरुण शरद पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. मला कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही असं गाऱ्हाणं सांगत होता. हा तरुण  हातात घड्याळ आणि गाडीची चावी कमरेला लावून आला होता. त्याला पाहून शरद पवारांनी या तरुणाची चांगलीच फिरकी  घेतली. “चावी  कशाची आहे, कोणत्या गाडीची आहे? घड्याळ कुठल्या कंपनीचं आहे?” अशा प्रश्नांची सरबत्ती पवारांनी त्या तरुणावर केली.  हा तरुण बुलेटवरुन आला होता. पवारांनी प्रश्नांचा भडीमार केल्यावर तरुणाची बोलतीच बंद झाली.

शरद पवार दुष्काळ दौऱ्यावर

शरद पवार दुष्काळी दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील चारा छावणीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला.  यावेळी एका शेतकऱ्याने तक्रार केली, फक्त पाच जनावरांना छावणीत प्रवेश आहे, सरसकट जनावरांना प्रवेश मिळावा, अशी विनंती शेतकऱ्याने केली.

रोज पंधरा किलो चारा मिळतो, मात्र जनावरांना अधिक चारा मिळावा. दोन हजार लिटर दूध संकलन होतं. त्या यलमार मंगेवाडी गावात आता दूध संकलन दोनशे लिटरवर आले आहे, अशी स्थिती गावकऱ्यांनी पवारांना सांगितली.

गावातील पोरं बाहेर शिक्षणाला किती आहेत, अशी विचारणा पवारांनी शेतकऱ्यांकडे केली. दुष्काळामुळे शिक्षणात अडथळा येत असेल तर मदत करण्याबाबत प्रयत्न करु, असं पवारांनी सांगितलं.

संबंधित बातम्या 

78 वर्षीय पवारांच्या 80 सभा, मतदान करुन दुष्काळ दौऱ्यावर रवाना   

माझ्या वक्तव्याचा विपर्यास, मतदानानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया   

पवारांच्या मते पंतप्रधानपदासाठी ‘हे’ तिघे जण प्रबळ दावेदार   

शरद पवारांनी नात आणि जावयासोबत केलं मतदान