‘हे’ पाहून लक्षात आलंय, मोदी देशात हुकूमशाही आणणार…; शरद पवारांचं जाहीर सभेत वक्तव्य

| Updated on: Apr 26, 2024 | 6:52 PM

Sharad Pawar Sabha in Pandharpur Full Speech Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा होत आहे. या सभेला शरद पवार संबोधित करत आहेत. शरद पवारांच्या भाषणातील मुद्दे, वाचा सविस्तर...

हे पाहून लक्षात आलंय, मोदी देशात हुकूमशाही आणणार...; शरद पवारांचं जाहीर सभेत वक्तव्य
Follow us on

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सांगोल्यात सभा होत आहे. माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोल्यात ही सभा होते आहे. या सांगोल्यातील सभेला शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, शेकापचे बाबासाहेब देशमुख यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित आहेत. यावेळी बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना निवडून देणं हे धोक्याचं आहे, असं शरद पवार म्हणालेत.

नरेंद्र मोदी देशात हुकुमशाही आणणार- पवार

आताचे हे सरकार दिल्लीच्या मुख्यमंत्र्यावरती ज्यांनी शैक्षणिक,आरोग्य दर्जा वाढवायचे काम केलं त्यांनी दिल्लीच्या सरकारवर टीका केली. यामुळे त्यांना अटक करण्याची भूमिका या सरकारने घेतली. हे पाहून आमच्या लक्षात आलं की मोदी साहेब या देशात हुकूमशाही आणणार आहेत, अशा शब्दात शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी देणं धोक्याचं”

बाहेर देशातून अमेरिकेतून इंग्रज राष्ट्रातून काही लोक आपल्या देशात आलेले आहेत. ते मला दोन दिवसापूर्वी भेटल्यावर ती मी त्यांना विचारलं की तुम्ही का आलात? तर त्यांचा असं म्हणणं आलं की या देशातील लोकशाही टिकणार आहे की नाही हे बघण्यासाठी आम्ही या देशांमध्ये आलेलो आहोत. त्यामुळे ही निवडणूक साधी सोपी नाही. नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी देणे हे धोक्याचे आहे, असं शरद पवार सांगोल्यातील सभेत म्हणाले.

या देशातला सामान्य माणूस जो व्यवसायावरती अवलंबून आहे या लोकांच्या हिताची चांगली भावना या गृहस्थाच्या मनामध्ये आहे का नाही याबद्दल शंका वाटते. या व्यवसायांमध्ये 36 टक्के शेती आणि शेतीशी निगडित दुग्ध व्यवसाय आहे. सध्याचा शेतकरी आणि शेती अतिसंकटात आहे. शेतकऱ्यांचे हितासंबंध नरेंद्र मोदींच्या मनामध्ये आहेत का नाही याची शंका आहे, असं शरद पवार म्हणाले.