राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (NCP) स्थापना 25 मे 1999मध्ये झाली. त्यापूर्वी शरद पवार (Sharad Pawar), पीए संगमा आणि तारिक अन्वर हे तिन्ही नेते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना काँग्रेसचं अध्यक्ष करण्यात आलं. त्यामुळे या तिघांनीही विदेशीत्वाचा मुद्दा उपस्थित करून पक्ष सोडला. पीए संगमा यांना राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवायची होती. पण संयुक्त पुरोगामी आघाडीने प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला. तरीही संगमा हे मुखर्जी यांच्या विरोधात मैदानात होते. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संगमा यांनी शरद पवार यांची साथ सोडून नॅशनल पीपल्स पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. शरद पवार यांनी सप्टेंबर 2018मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेल प्रकरणात क्लीन चिट दिली. त्यामुळे नाराज झालेल्या तारिक अन्वर यांनीही पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर 19 वर्षाने अन्वर पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादीने महाराष्ट्रात काँग्रेस आणि शिवसेनेशी आघाडी करून सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. मात्र, शिवसेनेत बंड झाल्याने पक्ष फुटला. राज्यातील सत्ता गेली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद आलं. विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काम पाहत असतानाच अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादीत फूट पडली. अजितदादा यांच्या गटाने भाजप आणि शिंदे गटाशी हातमिळवणी करून सत्तेत सहभाग घेतला आहे. सध्या राज्यात महायुतीचं सरकार असून अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. तर, राष्ट्रवादीचा ताबा आणि चिन्हाचं प्रकरण निवडणूक आयोगात प्रलंबित आहे.