Chandrakant Patil: वेळ आणि पैसा कशाला वाया घालवता? अर्ज मागे घ्या…चंद्रकांत दादांच्या त्या सल्ल्याने वाद पेटणार?
Chandrankant Patil on Sangli ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांचा टिकाव लागणार नसल्याचा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. वेळ आणि पैसा कशाला वाया घालवता, अर्ज मागे घ्या असा सल्लाच चंद्रकांत दादांनी दिला. त्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.

Chandrankant Patil on Sangli ZP Election: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी महायुतीने कंबर कसली आहे. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे नेते सुद्धा मैदानात उतरले आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येलाच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांचा टिकाव लागणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. विरोधकांनी वेळ आणि पैसा वाया घालवू नये, त्यांनी अर्ज मागे घ्यावा असे वक्तव्य चंद्रकांत दादांनी केला. त्यामुळे हा दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यांच्या वक्तव्यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.
वेळ आणि पैसा कशाला वाया घालवता?
चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यात कार्यक्रम घेतला. त्यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी नगरपालिका, नगरपरिषद तसेच महापालिका निवडणुकीतील भाजपच्या घवघवीत यशाचे दाखले विरोधकांना दिले. विरोधकांनी आता या निवडणुकीवरुन तरी आत्मपरिक्षण करावे असा सल्ला त्यांनी दिला. नगरपालिकेचे निकाल पाहता विरोधकांना जमिनीवरची हकीकत कळली असेलच असा टोलाही त्यांनी लगावला. उद्या अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. विरोधकांनी परिस्थिती पाहता शहाणपण दाखवावे. त्यांनी अर्ज मागे घ्यावा असा सल्ला चंद्रकांतदादांनी दिला. वेळ आणि पैसा कशाला वाया घालवता, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
जनतेचा कौल कसा बदलणार?
राजकीय गट, यंत्रणेला टोला असे राजकारणातील ग्रामीण भागातील गुळगुळीत शब्द काय असतात यावर त्यांनी भाष्य केले. मला ग्रामीण भागातील राजकारणाची चांगली माहिती आहे. गट टिकवणे असो वा यंत्रणा कामाला लावणे, की बळ देणे हे शब्द आपण जवळून अनुभवल्याचे ते म्हणाले. विरोधक आपली संपूर्ण यंत्रणा आणि आर्थिक ताकद लावून थकतील, पण जनतेचा कौल त्यांना बदलता येणार नाही. शेवटी विकासाचा विजय होईल असा दावाही पाटील यांनी केला.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळात पोहचला आहे. लाडकी बहीण योजना असो वा शेतकरी सन्मान योजना, त्यावर सर्वसामान्य लोक खुश आहेत. जनतेचा हा आनंद आणि पाठिंबा आगामी निवडणुकीच्या निकालांमधून स्पष्टपणे दिसेल.या निवडणुकीत विरोधकांचा टिकाव लागणे अवघड असल्याने त्यांनी वेळ आणि पैसा वाया घालवू नये असा सल्ला दादांनी दिला. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू असून हा प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा दावा विरोधक करत आहेत.
