…तर उपमुख्यमंत्र्यांना विमानतळावर जाण्याची पंचाईत होईल, जरांगेंच्या इशाऱ्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणावरून पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी शिंदेंची सभा उधळणार असल्याचा इशारा दिल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. त्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. एकीकडे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असताना दुसरीकडे परभणीत एकनाथ शिंदेंचा शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेंचा यांना मोठा इशारा दिला आहे. मेळावा रद्द केला नाही, तर उपमुख्यमंत्र्यांना नांदेड विमानतळावर जाण्याची पंचाईत होईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. जरांगे यांच्या इशाऱ्यावर शिंदे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या पहिल्या दिवसापासूनच आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक येऊ लागले आहेत. मुंबईत आंदोलनाची परवानगी न मिळाल्यानंतर जरांगे यांनी अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिंदे गटाने परभणीतील शेतकरी मेळावा रद्द करावा, अन्यथा गोंधळ अटळ आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील याांनी दिला. त्यावर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले, ‘मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भात शिंदेसाहेबांनी अनेक निर्णय घेतले. त्यांच्यासाठी एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेतलाय. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं काम सरकार करत आहे’.
मनोज जरांगे यांच्या इशार्यावर खासदार म्हस्के म्हणाले, ‘मी या संदर्भात माहिती घेतो. मनोज जरांगे पाटील यांचा आम्ही आदर करतो. मला वाटत नाही, असं त्यांनी म्हटलं असेल. त्या संदर्भात आमची काही मंडळी आहेत. प्रसाद लाड आणि इतर मंडळी त्यांच्याशी संपर्क साधतात. त्यांच्याशी मी बोलतो. नक्कीच भूमिका जाणून घेतो’.
परभणीत पोलीस अलर्ट
एकनाथ शिंदे यांचा परभणीत होणारा शेतकरी मेळावा रद्द करा, अशी धमकी जरांगे पाटील यांनी दिल्यानंतर परभणीत पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. खासदार संजय जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मराठा आंदोलकांकडून सभा उधळणार असल्याच्या व्हायरल मेसेजनंतर खासदार संजय जाधव यांच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.