एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेत तुफान राडा! सदावर्ते समर्थक आणि शिव परिवहन सेनेचे संचालक भिडले; CCTV फुटेज TV9 च्या हाती
ST Cooperative Bank Dispute News: एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेत संचालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचे CCTV फुटेज TV9 च्या हाती लागले आहे.

एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात संचालकांमधील वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. शिव परिवहन वाहतूक सेनेचे संचालक आणि गुणरत्न सदावर्ते समर्थक संचालक यांच्यात हा राडा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच दोन्ही बाजूंच्या संचालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज TV9 च्या हाती लागले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तसेच काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्यालयात घडलेल्या या प्रकारामुळे बँकेतील अंतर्गत वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. बँकेमध्ये शिव परिवहन वाहतूक सेनेचे बहुमत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे असतानाही सदावर्ते समर्थक संचालकांकडून बँकेच्या कामकाजात अडथळे आणले जात असल्याचा आरोप शिव परिवहन वाहतूक सेनेकडून करण्यात येत आहे. याच वादातून दोन्ही गटांतील संचालक आमनेसामने आल्याची माहिती समोर आली आहे.
बँकेच्या मुख्यालयात झालेल्या या घटनेदरम्यान दोन्ही बाजूंच्या संचालकांमध्ये जोरदार वाद झाला आहे आणि त्यानंतर हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे बँकेच्या कामकाजावर तसेच संचालकांमधील समन्वयावर प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने नेमका वाद कसा सुरू झाला आणि हाणामारीपर्यंत परिस्थिती कशी पोहोचली, याकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणावर शिव परिवहन वाहतूक सेनेचे सरचिटणीस संतोष शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आहे.
बँकेतील बहुमत आणि कामकाजात निर्माण होत असलेल्या अडथळ्यांच्या मुद्द्यावरून शिव परिवहन वाहतूक सेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे सदावर्ते समर्थक संचालकांची या आरोपांवरील प्रतिक्रिया समोर आलेली नाही. बँकेच्या मुख्यालयात पोलिसांसमोरच झालेल्या या राड्यामुळे एसटी सहकारी बँकेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित संचालकांच्या भूमिकेतून या वादाबाबत आणखी काय माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.