Raj Thackrey : मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुकांच्या पलीकडे जाऊन… राज ठाकरे यांचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आवाहन काय? पोस्ट चर्चेत

आज ६ जून, शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा होत आहे. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. राज ठाकरे यांनी हा दिवस केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्याची मागणी केली आहे. महाराजांनी भारतीयांमध्ये स्वराज्याची आस जागृत करत, परकियांच्या आक्रमणातून हिंद प्रांताला वाचवले, हा दिवस आपल्या वारशाचे स्मरण करण्याचा आहे.

Raj Thackrey : मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुकांच्या पलीकडे जाऊन... राज ठाकरे यांचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आवाहन काय? पोस्ट चर्चेत
राज ठाकरे यांची पोस्ट
| Updated on: Jun 06, 2026 | 11:49 AM

मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णक्षण आणि शिवरायांच्या प्रत्येक भक्ताला स्वाभिमान वाटेल असा दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन.. आज 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन असून रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्रातही विविध भागात या दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शिवरायांचे शौर्य, त्यांचे कार्य आठवून प्रत्येक जण या दिवशी पुन्हा त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही आजच्या दिनानिमित्त एक खास पोस्ट लिहीली आहे. ‘हा दिवस फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात सण म्हणून साजरा व्हायला हवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वराज्याची आस सामान्यांच्या मनात जागृत केली नसती तर ती कदाचित पुढची अनेक शतकं हा हिंद प्रांत खितपत पडला असता. म्हणून हा दिवस राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हायला हवा ‘ असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीलं आहे. मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुका याच्या पलीकडे जाऊन आपण कोणाचे वारस आहोत याचं स्मरण करत हा दिवस साजरा करावा, असंही राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय.

काय लिहीलंय राज ठाकरे यांनी ?

राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी त्यांच्या शब्दांत..

आज शिवराज्याभिषेक दिन. या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.

६ जून १६७४ ला जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला असेल त्यावेळचं वातावरण काय आनंदी, उत्साही असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी काही शतकं फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण हिंद प्रांत हा परकीयांच्या आक्रमणाने पूर्ण खचला होता. आक्रमकांच्या फौजांपुढे आपला टिकाव लागणारच नाही हे गृहीत धरून जवळपास प्रत्येक जण आक्रमकांना शरण गेला होता. अशावेळेला ‘स्वराज्य’ असावं असं स्वप्न बघायचं, आणि वयाच्या १५ व्या वर्षी स्वराज्याची शपथ घ्यायची आणि पुढे १ वर्षांत तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ करायची.

पुढे जवळपास २९ वर्ष झुंज देऊन एक असं राज्य जिथे आपली संस्कृती, आपली भाषा, यांना कुठलाही अटकाव नाही, आपली करपद्धती, आपली राज्यशासन पद्धती असलेलं एक राज्य उभं करायचं आणि त्याची घोषणा राज्याभिषेकाच्या निमित्ताने जगासमोर करायची. हा दिवस असा दिवस आहे ज्याने पुढे मरहट्ट्यानी हिंद प्रांतावर राज्य केलं, त्याची बीज रोवलीच पण पुढे ब्रिटिशांच्या विरोधात उभारल्या गेलेल्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देखील राज्याभिषेक दिनातूनच मिळाली.
या दिवसाची तुलना ही ४ जुलै १७७६ रोजी अमेरिकेतील १३ वसाहतींनी स्वातंत्र्याची घोषणा केली त्याच्याशी होऊ शकते किंवा १४ जुलै १७८९ साली झालेल्या फ्रेंच क्रांतीच्या दिवसाशी होऊ शकते. या दोन्ही घटना घडायच्या आधी जवळपास १०० वर्ष आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ज्यातून त्यांनी स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा विचार रुजवला.

जसं या दोन घटनांनी अमेरिका आणि युरोप यांचा भूगोल बदलला आणि भविष्यच बदललं तशीच ताकद आपल्या शिवराज्याभिषेक दिवसांत आहे.

हा दिवस फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात सण म्हणून साजरा व्हायला हवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वराज्याची आस सामान्यांच्या मनात जागृत केली नसती तर ती कदाचित पुढची अनेक शतकं हा हिंद प्रांत खितपत पडला असता. म्हणून हा दिवस राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हायला हवा.

आणि मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुका याच्या पलीकडे जाऊन आपण कोणाचे वारस आहोत याचं स्मरण करत हा दिवस साजरा करावा.
पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा !

राज ठाकरे ।

 

Follow Us