सुनील तटकरेंना वारंवार लक्ष्य केल्याने राष्ट्रवादी आक्रमक; आमदार महेंद्र दळवींना संतोष बैलमारेंचे सडेतोड प्रत्युत्तर
रायगडच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना टार्गेट करत आहेत. त्याला आता राष्ट्रवादीने उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या महायुतीतील घटक पक्षात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रकार वारंवार होत आहे. गेले अनेक दिवस राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांना शिंदेसेनेचे अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी लक्ष्य करत आहेत. आता या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.
शिंदेसेनेचे अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर वारंवार टीका करत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य अॅड. संतोष बैलमारे यांनी आमदार दळवी यांच्या वक्तव्यांचा समाचार घेत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दळवी यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यामुळे रायगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिंदेसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.अलिबागचे शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यातील राजकीय शाब्दिक युद्ध आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.
सुनील तटकरे यांच्यावर आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून वारंवार केली जाणारी टीका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य अॅड. संतोष बैलमारे यांनी दळवी यांच्या वक्तव्यांचा समाचार घेत त्यांना प्रत्युत्तर दिले. दुसरीकडे, खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला अध्यक्षा संजीवनी पिंगळे यांनीही आमदार दळवी यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. एकीकडे आमदार दळवी यांच्याकडून तटकरे यांच्यावर टीकेची झोड, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रत्युत्तरांची सरबत्ती सुरू झाली आहे. त्यामुळे रायगडच्या राजकारणात आगामी काळात हा वाद आणखी चिघळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.