Raj Thackrey : राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता झाली ते रेल्वे भरती आंदोलन प्रकरण नेमकं काय ? जाणून घ्या A to Z माहिती…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2008 च्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. ठाणे सत्र न्यायालयाने 18 वर्षांनी त्यांना निर्दोष मुक्त केले आहे. सरकारी पक्षाने ठोस पुरावा सादर न केल्याने न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निर्णयामुळे मनसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Raj Thackrey : राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता झाली ते रेल्वे भरती आंदोलन प्रकरण नेमकं काय ? जाणून घ्या A to Z माहिती...
राज ठाकरे यांना दिलासा
| Updated on: May 21, 2026 | 1:11 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2008 साली महाराष्ट्रात जे रेल्वे भरती आंदोलन झालं आणि त्यादरम्यान दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या प्रकरणात निकाल लागला आहे. या प्रकरणी राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल 18 वर्षांनंतर राज ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. ठाणे सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी राज ठाकरे यांना या संपूर्ण प्रकरणातून दोषमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला. गेल्या 18 वर्षांपासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत अखेर राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता झाली असून राज्यभरात मनसैनिकांनी जल्लोष केला आहे. ठाणे सत्र न्यायालयाच्या या निकालामुळे कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. राज ठाकरे यांच्यासाही मोठा दिलासा मानला जात आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

Loading...

हे संपूर्ण हे प्रकरण 2008 साली झालेल्या रेल्वे भरती परीक्षेदरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनांशी संबंधित आहे. स्थानिक महाराष्ट्रीयन तरुणांना रेल्वेमध्ये नोकरीच्या संधी नाकारली जात असल्याचा दावा करत, मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी, बाहेरील उमेदवारांना, विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशातील उमेदवारांना लक्ष्य केलं होतं. त्यावेळी कल्याण रेल्वे स्थानकावर झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, आणि त्यामध्ये अनेक उमेदवार जखमी झाले आणि पोलिसांशी देखील संघर्ष झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतरांवर दंगल, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि लोकसेवकांना त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणणे यासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले.

राज ठाकरेंवर काय होते आरोप ?

2008 साली रेल्वे भरती मंडळाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या बिहार आणि उत्तर प्रदेशातील उमेदवारांना लक्ष्य केल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर होता. राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध एकूण 54 गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जून 2009 साली अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर राज ठाकरे यांच्यासह इतर मनसैनिकांना अटकही करण्यात आली होती. नंतर त्यावेळी ठाकरे यांची 1 लाख रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यांना दिलासा मिळाला होता. मात्र न्यायालयात या प्रकरणी खटला सुरूच होता. अखेर आज न्यायालयाने राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता केली.

न्यायालयाचा निर्णय काय ?

या खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सरकारी पक्षाच्या भूमिकेवर आणि त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवर महत्त्वाची टिप्पणी केली. सरकारी पक्षाने न्यायालयात असा कोणताही ठोस किंवा भक्कम पुरावा मांडला नाही, ज्याच्या आधारे हा गुन्हा सिद्ध होऊ शकेल, असे न्यायालयाने निर्णय देताना स्पष्ट केलं. दोन्ही बाजूंच्या पुराव्यांचे सखोल निरीक्षण केल्यानंतर न्यायालयाने राज ठाकरे यांना कथित चिथावणी दिल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं.

ठोस आणि सबळ पुरावे कोर्टासमोर नसल्याने कोर्टाने केलं निर्दोष मुक्त

२००८ च्या प्रकरणात आज इतक्या वर्षानंतर निकाल आला आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. न्यायालयाने निकाल देताना या प्रकरणात मारहाणीत प्रत्यक्षात सहभागी असलेले आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले नाहीत असे म्हटलं आहे, असं राज ठाकरे यांचे वकील सयाजी नागरे यांनी सांगितलं. राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणाची सीडी कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरली नाही कारण इलेक्ट्रॉनिक पुरावा असेल तर त्यासाठी 65बी चं प्रमाणपत्र आवश्यक असत ते सरकारी पक्षाने कोर्टात सादर केले नव्हतं. 65बी चं प्रमाणपत्र नसल्याने ती सीडी कोर्टात प्ले करण्यात आली नाही आणि नेमक त्यात काय आहे हे कोर्टाच्या रेकॉर्डवर आलेलं नाही. ठोस आणि सबळ पुरावे कोर्टासमोर नसल्याने सर्वांना आज कोर्टाने निर्दोष मुक्त केलं आहे, असं ते म्हणाले.

केसेसने आम्हाला फरक पडत नाही… अविनाश जाधव

राज ठाकरे यांच्या मुक्ततेनंतर मनसे नेते अविनाश जाधव यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. आज ठाणे कोर्टामध्ये जे घडलं ते चांगलं घडलं. आता रेल्वेच्या सर्व परीक्षा मराठीत होत आहेत रेल्वे भरती प्रकरणात नंतर अनेक तरुण रेल्वेमध्ये कामाला लागले आहेत. सर्व श्रेय मनसैनिक आणि राज ठाकरे यांचं आहे. 20 वर्षानंतर सर्वांची निर्दोष मुक्तता झाली. राज ठाकरे यांच एक वाक्य होतं कोर्टाच्या बाहेर येताना अस्वलाच्या अंगावरती एक केस कमी झाला. केसेसने आम्हाला फरक पडत नाही, असं ते म्हणाले.

सर्व केसेसे मराठी माणसासाठी, तरुणांसाठी घेतल्या आहेत. मराठी माणसाच्या फायद्यासाठी आम्ही पुढे यायला तयार आहोत, असंही जाधव म्हणाले.

कोर्टाने पूर्ण सुनावणी ही मराठीत घेतली आहे. याची ऑर्डर कॉपी देखील मराठीत काढणार आहेत. कोर्टाला देखील कळलं आहे, राज साहेब समोर उभे असतील त्या सर्व गोष्टी मराठीतच झाल्या पाहिजे. मराठी मध्ये मराठीसाठी लढणारा एकमेव नेता म्हणजे राज साहेब ठाकरे. राज ठाकरे यांना चुकीच्या पद्धतीने या विषयांमध्ये आरोपी करण्यात आलं होत. राजकीय दबावापोटी राज ठाकरे यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता, असाल आरोप जाधव यांनी केला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us