दीड तासाचं अंतर, चार तासांचा प्रवास; ट्राफिक जामने घेतला 20 महिन्यांच्या चिमुरड्याचा जीव

Alibag News: बेलकडे-अलिबाग मार्गावरील रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या ट्राफिक जाममध्ये रुग्णवाहिका अडकली. यामुळे वेळेत उपचार मिळाले नाहीत आणि २० महिन्यांच्या चिमुरड्याची प्राणज्योत मालवली होती.

दीड तासाचं अंतर, चार तासांचा प्रवास; ट्राफिक जामने घेतला 20 महिन्यांच्या चिमुरड्याचा जीव
Traffic at alibaug Belkade road took 20 month old child life
| Updated on: Nov 18, 2026 | 10:33 AM

अलिबागमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. वाहतूक कोडीचा प्रश्न आता जीव घेण्यापर्यंत पोहचला आहे. अलिबाग तालुक्यातील बेलकडे-अलिबाग मार्गावरील ही घटना आहे. बेलकडे-अलिबाग मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे अवघ्या एक वर्षे आठ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाला. या चिमुकल्याने आपला जीव गमावल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे सगळीकडेच संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बामणगाव येथील आरांश सुशील ठाकूर याने दुपारी दीड ते दोनच्या सुमारास खेळताना फुगा गिळला आणि त्याला ताडणीने वैद्यकीय मदत हवी होती. त्याची प्रकृती गंभीर झाली होती. कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णवाहिकेतून अलिबाग जिल्हा रुग्णालयाकडे घेऊन जायला निघाले. पण बेलकडे-अलिबाग मार्गावरील रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली. वाहतुकीचा वेग मंदावल्यामुळे रुग्णवाहिकेलाही वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे कठीण झाले. दीड तासांच्या अंतराला तब्बल चार तास गेले. दुपारी सुमारे चारच्या सुमारास रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचली. पण तोवर वेळ निघून गेली होती. तोपर्यंत आरांशचा मृत्यू झाला होता. अवघ्या २० महिन्यांच्या चिमुरड्याचा जीव वाहतूक कोंडीने घेतला होता. या घटनेमुळे बामणगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading...

मृतदेह घरी घेऊन जातानाही हाल

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरानी त्याला मृत घोषीत केल्यानंतर त्याला परत घरी घेऊन जाण्यात आलं. आपण सर्वात गोष्ट म्हणजे त्याचा मृतदेह घरी घेऊन जातानाही त्याला वाहतूक कोंडीत अडकावे लागले. घरी जातानाही तब्बल दोन तासांहून अधिक वेळ लागला. या सगळ्या प्रकारामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला.

ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी!

काम सुरु असताना आपत्कालीन वाहतुकीसाठी कोणती व्यवस्था करण्यात आली होती? विकासकामे करताना असा नागरिकांना त्रास देणे योग्य आहे का? प्रशासन व ठेकेदाराने आवश्यक ती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक नाही का? असे अनेक प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी होत आहे. सगळ्याच गोष्टींबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती देणे गरजेचे आहे असेही ते म्हणत आहेत. याशिवाय रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी झाली आणि त्या चिमुरड्याला वेळेवर उपचार मिळाला नाही. त्याची प्राणज्योत मालवली. यामुळे गावकऱ्यांनी संबंधित ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या हृदयद्रावक घटनेने बामणगाव परिसरात शोककळा पसरली असून, रस्त्यांच्या कामांचे नियोजन आणि आपत्कालीन वाहतुकीच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us