संजय राऊतांचे FDA अधिकाऱ्यांवर खळबळजनक आरोप, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले पुरावे असतील तर…

Tukaram Mundhe On Sanjay Raut FDA Allegations: एफडीएच्या अधिकाऱ्यांवरील कथित वसुलीच्या आरोपांवर तुकाराम मुंढेंनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी संजय राऊतांकडे पुराव्यांची मागणी केली आहे.

संजय राऊतांचे FDA अधिकाऱ्यांवर खळबळजनक आरोप, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले पुरावे असतील तर...
| Updated on: Sep 29, 2026 | 6:16 PM

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कथित वसुली आणि गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. यानंतर आता एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्विक-कॉमर्स व्यावसायिकांकडून परवाना निलंबित करण्याची भीती दाखवून पैसे उकळले जात असल्याचा आरोप केला होता. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच एका मोठा दावा मुंढेंनी केला आहे.

संजय राऊतांनी कथित ‘क्लोजिंग नोटिस’च्या रकमेचा उल्लेख करत ती पूर्वीच्या १०-१२ हजार रुपयांवरून ७५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंत वाढल्याचा दावा केला होतो. या आरोपांवर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, आरोप केले जात असतील, तर त्यासोबत ठोस माहिती आणि पुरावे देण्याची गरज आहे. कोणत्या अधिकाऱ्याने पैसे मागितले, कोणाकडून मागितले, नेमकी किती रक्कम मागितली, याची माहिती तपासासाठी आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितले.

Loading...

ते म्हणाले की, संबंधितांकडे व्हिडिओ, ऑडिओ किंवा अन्य कोणताही पुरावा असल्यास तो FDA कडे किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे द्यावा. तसेच पुढे तुकाराम मुंढेंनी संजय राऊतांकडून आपल्याला या आरोपांबाबत कोणतेही अधिकृत पत्र मिळाले नसल्याचेही म्हटले. माध्यमांमधूनच आपल्याला या आरोपांची माहिती मिळाली, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे केवळ आरोपांच्या आधारे कोणत्याही अधिकाऱ्याविरोधात तपास सुरू करणे शक्य नसल्याची भूमिका तुकाराम मुंढेंनी मांडली आहे.

संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रात एफडीएच्या कारवाईचे कौतुक करतानाच विभागातील काही अधिकाऱ्यांकडून कथित वसुली होत असल्याचा आरोप केला होता. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांच्या दाव्यांमध्ये परवाना निलंबनाची भीती दाखवून व्यावसायिकांकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे तुकाराम मुंढे यांनी पुरावे मिळाल्यास त्याची चौकशी करून कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता राऊत यांनी केलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ कोणते पुरावे समोर येतात आणि त्यावर FDAकडून पुढील कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us