UPSC आणि MPSC च्या अभ्यासाचं नियोजन, टॉपर्सच्या तोंडून ऐका

UPSC आणि MPSC च्या अभ्यासाचं नियोजन, टॉपर्सच्या तोंडून ऐका

मुंबई : यूपीएससीमार्फत एनडीए, सीएसई (Civil services examination), IFS अशा विविध परीक्षा घेतल्या जातात. आयएफएसचा निकाल गुरुवारी जाहीर झालाय. यापैकी आयएफएस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 89 जणांपैकी महाराष्ट्रातले 12 जण आहेत. सध्या सर्वत्र परीक्षेचा कालावधी आहे. 17 फेब्रुवारीला एमपीएससीची पूर्व परीक्षा आहे, तर त्यानंतर जूनच्या सुरुवातीलाच यूपीएससीची पूर्व परीक्षा आहे. अभ्यासाचं नियोजन करुन विद्यार्थी अभ्यास करत आहेत. पण अनेकांना योग्य मार्गदर्शनाची गरज भासते. यावेळच्या आयएफएसमध्ये उत्तीर्ण झालेल्या श्रीकांत खांडेकर आणि अभिजित वायकोस यांनी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास टिप्स दिल्या आहेत.

अभिजित वायकोस (IFS AIR 27) च्या मते, यूपीएससी क्रॅक करण्यासाठी विविध विषयाच्या अभ्यासासाठी वेगळी स्ट्रॅटेजी महत्त्वाची असते. हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्कवर जास्त फोकस करावा. अनेक विद्यार्थी फक्त हार्डवर्क करत बसतात आणि यातच वेळ जातो. त्यामुळे स्मार्टवर्क करावं, असा सल्ला अभिजित देतो.

पहिलं म्हणजे मागच्या वर्षाच्या म्हणजे आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहून परीक्षेचं स्वरुप समजून घ्या. कारण, परीक्षेचं स्वरुप समजून घेतल्याशिवाय अभ्यास करता येणार नाही आणि अभ्यास सुरु केला तरी तो लक्षात राहणार नाही. कोणत्या विषयाचे कसे प्रश्न येतात ते समजून घेण्यासाठी अगोदर मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहून घ्या.

यूपीएससीची पूर्व परीक्षा पास करायची असेल तर अभ्यास महत्त्वाचा आहेच. पण त्यासोबतच जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा. आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका तर वेबसाईटवर मिळतातच, पण विविध क्लासेसच्या प्रश्नपत्रिकाही महत्त्वाच्या ठरतात. ज्यामुळे प्रश्नांचा अंदाज येतो आणि यातूनच अभ्यास करायला मदत होते.

पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची परीक्षा म्हणजे मुख्य परीक्षा आहे. या परीक्षेत उत्तरं ही सविस्तर लिहायची असतात. त्यामुळे लिखाणाचा सराव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्नात तुम्ही जास्तीत जास्त लिहिण्यापेक्षा अधिक स्मार्ट पद्धतीने उत्तर कसं सादर करता यावर गुण मिळतात. इतरांपेक्षा काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. कारण, लिखाण तर सर्वच करतात. त्यामुळे डायग्राम, केस स्टडीज वापरुन तुम्ही उत्तर आणखी युनिक बनवू शकता.

पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखतही शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्याबद्दल तुम्ही स्वतःशी फक्त प्रामाणिक असावं आणि तुमच्या बाजूला काय घडतंय याविषयी जागरुक असावं, असा सल्ला अभिजित देतो.

अभ्यासाच्या या सर्व प्रवासामध्ये शांतता अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे मेडिटेशन करणे हा एक चांगला पर्याय आहे. याची तुम्हाला मोठी मदत होते. कारण, अभ्यासात मानसिक आणि शारीरिक दोन्हीही स्वास्थ्य राखणं तेवढंच महत्त्वाचं ठरतं.

आयएफएस परीक्षेतील यशस्वी उमेदवार श्रीकांत खांडेकर (IFS AIR 33) याच्याकडूनही आम्ही विद्यार्थ्यांसाठी टिप्स जाणून घेतल्या. सध्या एमपीएससीची पूर्व परीक्षा तोंडावर आहे आणि त्यानंतर जूनमध्ये यूपीएससीची पूर्व परीक्षा आहे. सध्या परीक्षांचा कालावधी असताना यशस्वी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

आयएफएसमधील यशाविषयी बोलताना श्रीकांत सांगतो, “आयएफएससाठी काही वेगळी तयारी केली नव्हती. खरं तर आयएएस आणि आयएफएससाठी पूर्व परीक्षा एकच असते. पण आयएफएसचा कटऑफ जास्त असतो. विज्ञान शाखेतील पदवीधरांना आयएफएसचा पर्याय उपलब्ध असतो. आयएएस मुख्य परीक्षेवर माझा फोकस होता. ऑक्टोबरमध्ये मुख्य परीक्षा झाल्यानंतर आयएफएससाठी तयारी केली आणि 45 दिवसात ही तयारी पूर्ण केली.”

“अभ्यास करताना नियोजन आणि ते नियोजन स्वतःने पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी प्रत्येक आठवड्याला 90 तासांचं टार्गेट ठेवलं होतं,” असंही श्रीकांतने सांगितलं.

सध्या जे परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी श्रीकांत सांगतो, “कोणतीही परीक्षा असेल तर त्यासाठी परीक्षेचं स्वरुप अगोदर नीट समजून घेतलं पाहिजे. गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहा, ज्यातून तुम्हाला अंदाज येतो. कोणते प्रश्न परीक्षेत येऊ शकतात त्याचा एक अंदाज यामुळे येतो आणि अभ्यासाचं नियोजन करायला सोपं जातं. अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये वेळेचं नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक विषयासाठी वेळ ठरवून घ्या. कोणत्या पुस्तकातलं किती वाचायचं याचा अंदाज प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर येतो.”

अभ्यास करणाऱ्या मुलांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतं. पण यातून बाहेर पडणं फार कठीण नसल्याचंही श्रीकांत सांगतो. या प्रवासात अनेक अडचणी येत असल्या तरी त्यातून बाहेर पडणं फार अवघड नाही. घरची परिस्थिती जरी हलाखीची असेल तर जिद्द असेल तर मदत करणारे अनेक हातही पुढे सरसावतात. तयारीसाठी दिल्लीलाच गेलं पाहिजे असं काही बंधन नाही. पुण्यामध्ये राहूनही ही तयारी चांगली होते. मार्ग निघत जातात, फक्त प्रयत्न सोडू नका, असाही सल्ला श्रीकांत देतो.

मराठी मुलांसाठी इंग्रजीची भीती ही मोठी समस्या आहे. यावरही श्रीकांतला आम्ही प्रश्न विचारला. त्याच्या मते, “कामापुरती इंग्लिश येत असेल तरीही पुरेसं आहे. यूपीएससीची परीक्षा मराठीतूनही देता येते. माझंही शिक्षण मराठीतून झालंय. पण प्रयत्न केल्यानंतर कोणतीही अडचण येत नाही,” असं त्याने सांगितलं.

यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेची तयारी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःचं 100 टक्के देऊन तयारी करता, तेव्हा यश नक्कीच मिळतं. पण प्रामाणिकपणे प्रयत्न करतानाच त्याला स्मार्टवर्कचीही जोड दिली पाहिजे, असं श्रीकांतने सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *