हल्ला इराणवर तीन दिवसाचा दुखवटा बीडमध्ये; अमेरिका, इस्रायलचा झेंडा जाळला

Iran Israel War : अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये शेकडो इराणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ परळीत इराणी समाज बांधव आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. बीडमध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

हल्ला इराणवर तीन दिवसाचा दुखवटा बीडमध्ये; अमेरिका, इस्रायलचा झेंडा जाळला
Beed
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 02, 2026 | 3:39 PM

गेल्या तीन दिवसांपासून इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये शेकडो इराणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगभरातील इराणी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अशातच आता अमेरिका आणि इजराइल यांनी केलेल्या इराणवर हल्ल्याच्या निषेधार्थ परळीत इराणी समाज बांधव आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. बीडमध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच काल शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी नागरिकांनी अमेरिका आणि इस्रायलचा ध्वज देखील जाळला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तीन दिवसांचा दुखवटा

बीडमधील इराणी बांधवांनी सांगितले की, इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनी यांचं बॉम्ब हल्ल्यांमध्ये निधन झालं. यामुळे संपूर्ण देशात जुलूस काढण्यात आला, काल आम्हीही शहरामध्ये रॅली काढून याचा निषेध केला. संपूर्ण देशामध्ये आमच्या समाजातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. आम्ही तीन दिवसाचा दुखवटा पाळत आहोत. पवित्र रमजान महिन्यात आमच्या अयातुल्ला अली खामेनी यांची शहादत झाली आहे. गेल्या 30-40 वर्षापासून त्यांचे कुटुंब लढाई लढत आहे, ही लढाई चालूच राहणार आहे.

अचानक हल्ला केला

पुढे बोलताना इराणी बांधवांनी म्हटले की, आम्ही गेल्या तीनशे चारशे वर्षापासून हिंदुस्तानमध्ये राहत आहोत. आमच्या सात पिढ्या झाल्या आहेत आणि परळीमध्ये येऊन आम्हाला 40 ते 45 वर्षे झाली आहेत. इराणी समाजच नाही तर संपूर्ण समाज या घटनेचा निषेध करत आहेत. आमच्यासाठी ही मोठी दुःखद घटना आहे. आमचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनेई यांच्या कुटुंबावर अत्यंत कायर पद्धतीने हल्ला केला आहे. एकीकडे चर्चा सुरू असताना अचानक हल्ला केला आहे.

आता हे युद्ध संपणार नाही

पुढे बोलताना इराणी बांधवांनी म्हटले की, अयातुल्ला अली खामेनी ही एक विचारधारा आहे, विचारधारा कधी मरत नसते. अमेरिका आणि इजराइलने केलेला हल्ला हाबूज दिल पणाचा आहे. अयातुल्ला यांचा मृत्यू झाला नाही, ते प्रत्येकाच्या मनामध्ये जिवंत आहेत. हे युद्ध आता संपणार नाही. ह्या युद्धाला थांबवणारे अयातुल्ला हेच होते. यापूर्वी 12 दिवसाचे युद्ध झालं होतं तेही यांनीच थांबवलं होतं. सगळ्यांनी मिळून इराणला साथ दिली पाहिजे.

परळीत मोर्चा

दरम्यान, इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर काल परळीत इराणी बांधवांनी मोर्चा काढला होता. परळीतील इराणी वस्ती ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोठ्या संख्येने इराणी नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

Follow Us