Praniti Shinde : ‘आम्ही हिंदू आहोत, पण…’ काय म्हणाल्या खासदार प्रणिती शिंदे?

Praniti Shinde : "पंतप्रधान मोदींनी 2014 साली माझ्यावर टीका केली. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पॅरामिलिटरी फोर्सच्या सैनिकांना गणवेश का दिला नाही? मात्र मागील दहा वर्षात एकही काम भाजपने केले नाही" अशी टीका सुशीलकुमार शिंदे यांनी केली.

Praniti Shinde : आम्ही हिंदू आहोत, पण... काय म्हणाल्या खासदार प्रणिती शिंदे?
प्रणिती शिंदे, खासदार
Image Credit source: Facebook
| Updated on: Sep 29, 2024 | 1:21 PM

“आम्ही हिंदू आहोत, मात्र धर्माच्या नावावर कधीही मत मागितले नाही. मी कामाच्या जोरावर मते मागितली, धर्माच्या नावावर कधीही मते मागितली नाहीत” असं सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. सोलापुरात पद्मशाली समाजाच्या अधिवेशनात त्या बोलत होत्या. अधिवेशनाला काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे तसेच माकपचे माजी आमदार नरसय्या आडम आदी व्यासपीठावर उपस्थित होते. “कोणत्याही प्रकारची कट्टरता हा अतिरेक असतो. कोणत्याही धर्मात कट्टरता असली तरी तो अतिरेक असतो. लोकसभा निवडणुकीत यांचे लोक द्वेष पसरवत होते. ध्रुवीकरणाच्या रोगाला बळी पडू नका” असं खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.

“युट्यूब आणि व्हाट्स अपवर येणारी लोकं बिनकामाची असतात. आता सोशल मीडियावर कोणी ट्रोल केले तर गप्प बसू नका. कोणी समाजात द्वेष पसरवेल त्यावेळी पोलिसात तक्रार द्या” असं आवाहन प्रणिती शिंदे यांनी उपस्थितांना केलं. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी कन्या, खासदार प्रणिती शिंदे यांचं कौतुक केलं. “आपल्या खासदारांनी अतिशय सुंदर भाषण केले. खासदारांनी ज्या गोष्टी मांडल्या त्यासाठी मी सोबत आहे” असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

हिंदू दहशतवादाच्या विधानावर सुशील कुमार शिंदे काय म्हणाले?

“पंतप्रधान मोदींनी 2014 साली माझ्यावर टीका केली. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पॅरामिलिटरी फोर्सच्या सैनिकांना गणवेश का दिला नाही? मात्र मागील दहा वर्षात एकही काम भाजपने केले नाही. विमानतळाचे ऑनलाईन असलेले उद्घाटन अंडरलाईन कधी होईल हे सांगता येत नाही” असं सुशील कुमार शिंदे म्हणाले. हिंदू दहशतवाद या विधानावर सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं. “मी गृहमंत्री असताना जो रिपोर्ट माझ्याकडे आला तोच मी मांडला होता. मात्र काही लोक याबाबत चकाट्या पिटत बसतात. माझं त्यांना आवाहन आहे की माझ्याकडे या, बसा, मी तुम्हाला सांगतो नक्की काय होतं ते” असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.