विखेंना आम्ही ऑफर दिली, पण त्यांना दगाफटक्याची भीती होती : अजित पवार

बारामती : काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी काँग्रेसकडून नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळत नसल्याने भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर आपला तो पार्थ आणि दुसर्‍यांचा तो सुजय अशी टीका होत असल्याबद्दल पत्रकारांशी …

विखेंना आम्ही ऑफर दिली, पण त्यांना दगाफटक्याची भीती होती : अजित पवार

बारामती : काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी काँग्रेसकडून नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळत नसल्याने भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर आपला तो पार्थ आणि दुसर्‍यांचा तो सुजय अशी टीका होत असल्याबद्दल पत्रकारांशी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

सुजय विखे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आपण याबाबत सुजय यांच्याशी चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचं काम करणार नाही असं वाटल्याने त्यांनी उमेदवारी नाकारल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हवा ओळखून माघार घेतली म्हणणार्‍यांना राजकारण तरी कळतं का अशा शब्दात त्यांनी टीकाकारांना टोला लगावलाय.

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना आपला तो पार्थ आणि दुसर्‍यांचा तो सुजय अशी चर्चा आता राजकीय क्षेत्रात होत असल्याबद्दल विचारलं असता, त्यांनी सुजय विखे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारीबाबत ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला. आपण आणि जयंत पाटील यांनी सुजय विखे यांच्याशी नगर दक्षिण ही राष्ट्रवादीकडील जागा देण्याबाबत चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचं काम करणार नाहीत अशी शंका वाटल्याने त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाकारल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीकडे वेगवेगळ्या नेत्यांनी मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याबाबत मागणी केली होती. मागील निवडणुकीत मतांचं विभाजन झालं. सर्वात मोठ्या संख्येने सुशिक्षित लोक असलेला मावाळ मतदारसंघ आहे. त्यामुळे यावेळी चांगला आणि सक्षम उमेदवार देण्याचा राष्ट्रवादीचा विचार होता. राष्ट्रवादीसह शेकापकडूनही पार्थ यांना उमेदवारी द्यावी असाच सूर होता. त्याचाच विचार करुन पक्षाने पार्थला उमेदवारी दिली असावी, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी पार्थ यांच्या उमेदवारीवर दिली.

शरद पवार यांनी अनेक निवडणुका लढवल्या आणि त्यात विजय मिळवलाय. असं असताना काहीजण त्यांनी हवा ओळखून माघार घेतल्याचं बोलतात, त्यांना राजकारण कळतं का नाही याबद्दल शंका येते, असं म्हणत अजित पवारांनी टोला लगावलाय. शरद पवार हे राज्यसभेवर आहेत, ती आयती विरोधकांच्या हाती जाऊ नये म्हणून लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगत आता घोडा मैदान दूर नाही, येत्या काही दिवसातच सगळं चित्र स्पष्ट होईल, असंही त्यांनी नमूद केलं.

पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने मावळ गोळीबाराचे फलक लावल्याबद्दल विचारलं असता, या प्रकरणाची चौकशी होऊन त्यातील सत्य सर्वांसमोर आलंय. तरीही जर कोणाला शंका असेल तर त्यांनी याची चौकशी करावी असा टोला अजित पवारांनी लगावलाय. माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीकडून सर्व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *