मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध, खासदारांची प्रशासनासोबत हमरीतुमरी

  • Sachin Patil
  • Published On - 15:58 PM, 16 Nov 2018

अहमदनगर : मराठवाड्याला पाणी देण्याच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा पाणी पेटलं आहे. जायकवाडीला नाशिकमधील धरणातून पाणी सोडण्यात आलं. मात्र आता गोदावरी नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यात असणारं साठवलेलं अल्पपाणीही आता बंधाऱ्यावरील फळ्या काढून सोडण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. याविरोधात शेतकरी संतप्त झाले असून नदीवरील सगळ्याच बंधाऱ्यांवर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलंय.

पुणतांबा, सडे, नाऊर यासह 15 बंधाऱ्यांवर प्रशासनाला विरोध करण्यात येत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर बंधाऱ्यावर सकाळपासून शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. सरकारकडे दाद मागण्याऐवजी भजन गात देवालाच साकडं घालण्याचं अभिनव आंदोलन करण्यात आलं.

कोपरगाव आणि श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. कोपरगाव तालुक्यातील सडे बंधाऱ्यावर शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही फळ्या काढण्यास विरोध करत आंदोलनात सहभाग घेतला.

यावेळी पोलीस अधिकारी आणि खासदार यांच्यात हमरीतुमरीपर्यंत वाद विकोपाला गेला. उपविभागीय अधिकारी अभिजीत शिवथरे आणि खा. लोखंडे यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. बंधाऱ्यातील एक थेंब पाणी सोडणार नसल्याचा इशारा खा. लोखंडे यांनी दिल्याने प्रशासनाची मोठी कोंडी निर्माण झाली होती.

एकदंरीत पुन्हा एकदा पाण्यावरून प्रादेशिक वादाला तोंड फुटलं असून पाणी प्रश्न पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तर हा प्रादेशिक वाद मिटवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न व्हावेत असे सूर आता उमटू लागले आहेत.