गरीबांची मुलं दत्तक घेऊन श्रीमंतांना विक्री, मुंबईत महिलांच्या टोळीला अटक

यामध्ये मुलं विकत घेणाऱ्या दोन जणांसह चार महिला आरोपींना अटक करण्यात आली. वंशाचा दिवा म्हणून मुलगा नाही, असं सांगत ही मुलं विकत घेण्यात आली होती. मात्र ते बेकायदेशीर असल्याने पोलिसांनी सापळा रचून या सर्व आरोपींना साखळी पद्धतीने अटक केली.

गरीबांची मुलं दत्तक घेऊन श्रीमंतांना विक्री, मुंबईत महिलांच्या टोळीला अटक

मुंबई : पैशांची गरज असलेल्या गरीब कुटुंबांना पकडून त्यांची मुलं दत्तक घेतो असं सांगून ते परस्पर जास्त पैशात विकणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांच्या अंधेरी युनिट सहा गुन्हे शाखेने अटक केली. यामध्ये मुलं विकत घेणाऱ्या दोन जणांसह चार महिला आरोपींना अटक करण्यात आली. वंशाचा दिवा म्हणून मुलगा नाही, असं सांगत ही मुलं विकत घेण्यात आली होती. मात्र ते बेकायदेशीर असल्याने पोलिसांनी सापळा रचून या सर्व आरोपींना साखळी पद्धतीने अटक केली.

सध्या 21 व्या शतकात आपण जगत आहोत, मात्र तरीही वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा हा हट्ट इथली जनता सोडत नाही. या हट्टापायी बेकायदेशीरपणे मुलं विकणाऱ्या टोळीकडून मुलं विकत घेणं किती महागात पडतं त्याचा प्रत्यय देणारी ही घटना आहे. हॉस्पिटलशी संबंधित असणाऱ्या अनेक ठिकाणी काम करणाऱ्या चार महिला आरोपींनी एक टोळी बनवली. या टोळीच्या माध्यमातून पैशांची गरज असलेल्या पालकांना शोधून त्यांची मुलं हे दुसऱ्यांना दत्तक पद्धतीने देण्यात येत होते. त्यांना दर महिन्याला मुलांची सुरक्षितता पाहता येईल अशी अट ही टोळी ठेवत होती. मात्र गेल्या तीन वर्षांपूर्वी दत्तक पद्धतीने विकलेल्या पालकांना आपल्या मुलाला एकदाही न पाहता आल्याने त्यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी अगदी शिताफीने तपास करत या टोळीच्या मुसक्या आवळल्या.

कायद्यानुसार प्रक्रिया करुन मुलं दत्तक घेतलीही जातात. मात्र तुम्हाला मुल दत्तक मिळेल म्हणून कुणी जास्त किंमत सांगत असेल तर पहिल्यांदा याची खात्री करा, कायदेशीर पद्धतीने सर्व पत्र व्यवहार पूर्णपणे पार पडतोय का हेही तपासा आणि त्यानंतरच या प्रकरणांमध्ये लक्ष घाला. कारण, एका पालकांकडून दत्तक पद्धतीने देणार असल्याचं सांगून दुसऱ्या ग्राहकांना अगदी महागड्या पद्धतीने नवजात बालकांची विक्री या टोळीकडून केली जात होती. यामधल्या चारही आरोपी महिला या हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या आणि आपलं सावज हेरत होत्या. आरोपी महिलांबरोबरच दोन मुलं विकत घेणाऱ्या दोन वेगवेगळ्या पालकांनाही अटक करण्यात आली. त्यांच्यावर मुले तस्करीचा आरोप ठेवण्यात आलाय.

हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सुनंदा बिका मसाले, सविता मंगेश साळुंखे, भाग्यश्री कदम, आशा उर्फ ललिता जोसेफ या आरोपी महिलांनी एक टोळी बनवली होती. त्या नवजात बालकांची विक्री करण्याचं काम करत होत्या. गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांचं हे काम सुरू होतं. मात्र पोलिसांनी अगदी शिताफीने यांना अखेर अटक केली. त्या सध्या पोलीस कोठडीत आहेत. नवजात बालकांची सुटका करण्यात पोलिसांना यश आलंय. या महिलांनी अजून कोणत्या मुलांना अशाप्रकारे विकलं आहे का याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *