मोठी बातमी! तिरंगा रॅलीआधीच अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी मोठी गर्दी
दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिरंगा रॅलीची सुरुवात होण्यापूर्वीच ही मोठी घडामोड समोर आली आहे.

दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिरंगा रॅलीची सुरुवात होण्यापूर्वीच ही मोठी घडामोड समोर आली आहे. अभिजीत दिपके यांच्याकडून ‘लेहरा दो तिरंगा रॅली’चं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी सीजेपीचे समर्थक मोठ्या संख्येने जमले आहेत. पण यावेळी अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता प्रमुख चेहरा म्हणजे नेतृत्त्व करणारा चेहराच ताब्यात गेल्यामुळे आता या रॅलीचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे मोठे कार्यकर्ते जमले आहेत. त्याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. फक्त ११ जणांनाच तिरंगा फडकवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. पण सीजेपीचे कोणतेही मोठे चेहरे आता आंदोलनस्थळी पोहचलेले नाहीत.
दरम्यान, यावेळी पोलिसांनी दिपकेंना ताब्यात घेतलं त्यावेळी माझा गुन्हा काय असा सवाल दिपकेंनी पोलिसांना केला. पोलिसांनी दिपकेंना सांगितलं की आंदोलनाची परवानगी दिलेली नाही. तरी तुम्ही याठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करत असल्यामुळे तुम्हाला ताब्यात घेण्यात येत आहे. आज दुपारपासूनच अभिजीत दिपके यांच्या घरी पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा सुरु केली होती. त्यांनंतर दिपकेंवर कारवाई होणार का, त्यांना अटक होणार का असा सवाल निर्माण झाला होता.
दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या लहरा दो तिरंगा या रॅलीला मनाई केली होती. त्यासाठी दिपकेंना त्यांच्या घरी जाऊन नोटीसही दिली होती. दिपकेंनीही त्यावर सही केली होती. दरम्यान, प्रस्तावित आंदोलन ज्याठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे. त्याठिकाणी १६३ कलम लावण्यात आलं आहे. सेट्रल पार्क त्याच भागात असून रॅलीमुळे तिथे व्यवसायिकांना अडचण निर्माण होईल, महापालिकेची परवानगीही घेण्यात आली नसल्याचे सांगत पोलिसांनी दिपकेंना नोटीस दिली होती. तिरंगा फडकावणं हा गुन्हा नाही, पण परवानगी न घेता गर्दी जमवणं आणि रॅली काढणं हा गुन्हा असल्याचं पोलिसांनी आधीच सांगितलं होतं, त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.