Abhijeet Dipke: उद्धव ठाकरे सर, आपले मनापासून आभार… अभिजीत दीपके असं का म्हणाले? त्या पोस्टची देशभर चर्चा
Abhijeet Dipke: सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या न्यायालयीन कोठडीविरोधात सीजेपीने दिल्ली उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. सीजेपीने तात्काळ सुनावणीची मागणी केली आहे. या दरम्यान अभिजीत दीपके यांनी पाठिंबा दिल्याबद्दल यूबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या न्यायालयीन कोठडीविरोधात अभिजीत दीपके आक्रमक झाले आहेत. त्यांना शिवसेना (यूबीटी)चे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दसरा मेळाव्यात अभिजीत दिपके यांचे कौतुक केले आहे. त्यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले की, हातात झेंडा घेतला म्हणून त्यांना आत टाकले जाते. तिरंग्याबाबत त्यांचा द्वेष आहे.
अभिजीत दिपके यांनी उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले की, “आशु आणि सौरव यांच्या बेकायदेशीर अटकेविरोधात आवाज उठवल्याबद्दल उद्धव ठाकरे सर, आपले धन्यवाद.”
रांका आणि दास यांच्या समर्थनार्थ तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि बिजू जनता दळाचे प्रमुख नवीन पटनायक यांनीही मत मांडले. १३ ऑक्टोबरला सौरव दास आणि आशुतोष रांका सीजेपीच्या इतर ११ सदस्यांसोबत जंतर मंतरवर पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्या हातात तिरंगा होता. आंदोलनामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
उच्च न्यायालयात सीजेपी
शांतीभंग केल्याच्या आरोपावरून दंडाधिकाऱ्यांनी १४ ऑक्टोबरला दास आणि रांका यांना पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. सोमवारी त्यांची न्यायालयीन कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढवण्यात आली. याविरोधात सीजेपी उच्च न्यायालयात गेली आहे आणि तात्काळ सुनावणीची मागणी करत आहे. सीजेपीच्या कायदेशीर प्रकरणांचे प्रमुख रत्ना सिंह यांनी म्हटले की, सौरव आणि आशुतोष यांना एक मिनिटही तुरुंगात थांबायला नको. राजकीय खेळतमाशांमुळे त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाऊ नये.
दिल्ली उच्च न्यायालयाने आज तात्काळ सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे. आजच सौरव दास आणि आशुतोष रांका यांची न्यायालयीन कोठडी संपत आहे. दीपके यांनी १९ ऑक्टोबरला म्हटले की, आशु आणि सौरव यांचा पहिला गुन्हा जंतर-मंतरवर तिरंगा फडकवणे हा होता. त्यांचा दुसरा गुन्हा? मागे हटण्यास नकार देणे. तुरुंगात पाच दिवस घालवल्यानंतरही ते चेहऱ्यावर स्मित हास्य आणि पूर्ण आत्मविश्वासाने न्यायालयात पोहोचले आहेत.