मी काय केलं? मी एकटाच तर आहे… अभिजीत दीपके जोरजोरात ओरडत होते, पण…
अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांनी कॅनॉट प्लेसमध्ये पोहोचण्यापूर्वीच ताब्यात घेतले. कोणताही कायदा मोडला नसतानाही त्यांना अटक केल्याने सीजेपी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. दीपके यांच्या अटकेनंतरही सेंट्रल पार्क येथे शेकडो नागरिक तिरंगा घेऊन शांततेत जमले. पोलिसांनी ही रॅलीही मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे वातावरण अधिकच तापले आहे.

मी काय केलंय? मी काय केलंय? मी एकटाच तर आहे. माझ्यासोबत कोणी नाही. मीडियावाल्यांचीच अधिक गर्दी आहे. मी कोणताच कायदा तोडला नाही. मग मला अटक का करत आहात? असं अभिजीत दीपके ओरडत होते. पण दिल्ली पोलिसांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही. घरातून बाहेर पडताच दिल्ली पोलिसांनी दीपकेंना ताब्यात घेतलं. कोणतंही कारण दिलं नाही. कॅनॉट प्लेसवर न पोहोचताच घराबाहेरूनच दीपकेंना ताब्यात घेण्यात आलं. त्यामुळे सीजेपीचे कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत.
दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांना दुपारी दिल्लीतील घरी जाऊन नोटीस दिली होती. त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली होती. तुम्ही आंदोलन करू नका म्हणून सांगितलं होतं. पण दीपके आंदोलनावर ठाम होते. दीपके घरातून बाहेर पडताच तिथं असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना रोखलं. तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह कस्टडीत घेण्यात येत आहे. कॅनॉट प्लेसमध्ये कलम 163 लागू आहे. तुम्हाला ताब्यात घेतलं जात आहे, असं पोलिसांनी दीपके यांना सांगितलं. त्यावर, मी तर कोणताच कायदा ब्रेक केला नाही. माझ्यासोबत कोणीच नाही, मी एकटाच आहे, असं दीपके पोलिसांना ओरडून ओरडून सांगत होते. पण पोलीस ऐकायला तयार नव्हते. यावेळी मीडियाची प्रचंड गर्दी होती. कॅनॉट प्लेसला जाण्यापूर्वीच दीपकेंना ताब्यात घेण्यात आल्याने वातावरण अधिकच तापलं आहे. सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
कुठे नेलं माहीत नाही…
दीपके यांच्या घराच्या बाहेर सकाळपासूनच पोलीस तैनात होते. दीपके यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जात होतं. दीपके घराच्या बाहेर येताच त्यांना पोलिसांनी आधी अडवलं. तुम्हाला ताब्यात घेण्यात येत असल्याचं सांगितलं आणि दीपकेंना जबरदस्तीने गाडीत घुसवून त्यांना सोबत घेऊन गेले. मात्र, त्यांना कुठे नेलं हे अद्याप कुणालाच माहीत नाही. त्यामुळे सीजेपीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
ते झुकले नाहीत…
अभिजीत दीपके यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर कॅनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कवरील आंदोलनाचा फियास्को होईल असा पोलिसांचा अंदाज होता. पण पोलिसांचा हा अंदाज साफ खोटा ठरला. सेंट्रल पार्कवर शेकडो नागरिक जमले होते. प्रत्येकाच्या हातात तिरंगा होता. या नागरिकांनी अत्यंत शांततेने तिरंगा रॅली सुरू केली. नेत्याविना ही रॅली सुरू झाली. मात्र, पोलिसांनी ही रॅलीही मोडीत काढण्यास सुरुवात केली. असंख्य आंदोलकांची धरपकड सुरू करण्यात आली. त्यामुळे सेंट्रल पार्क परिसरातील वातावरण अधिकच तापलं आहे.