मोठी बातमी! भाजपाचा करेक्ट कार्यक्रम; तीनच्या बदल्यात 5 फोडले, बड्या नेत्यांनी सोडला पक्ष, सर्वात मोठा धक्का
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपला मोठा धक्का बसला आहे. बुधवारीच तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता भाजपच्या पाच नेत्यांनी पक्ष सोडला आहे.

लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीला धक्क्यावर धक्के बसत असल्याचं पहायला मिळत आहे. इंडिया आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी एनडीएच्या घटक पक्षात प्रवेश केला. सर्वाधिक प्रवेश हे एनडीएचा प्रमुख पक्ष असलेल्या भाजपमध्ये झाले आहेत. बुधवारीच भाजपने समाजवादी पार्टीला मोठा धक्का दिला. समाजवादी पार्टीच्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.यामध्ये उत्तर प्रदेशच्या गोसाईगंज विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभय सिंह, गौरीगंज विधानसभा मतदारसंघाचे आमदार राकेश प्रताप सिंह आणि कालपी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद चतुर्वेदी यांचा समावेश आहे. या तीनही आमदारांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान त्यानंतर अवघ्या 24 तासांमध्येच सपाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. ऐन उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक नाही दोन नाही तर भाजपच्या तब्बल पाच नेत्यांनी सपामध्ये प्रवेश केला आहे, ज्यामध्ये भाजपच्या काही प्रमुख नेत्यांचा तसेच माजी आमदारांचा देखील समावेश आहे.
हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या सर्व भाजपच्या नेत्यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला आहे. यामध्ये भाजपचे माजी आमदार राजीव चन्ना, भाजपच्या मागासवर्गीय मोर्चा आघाडीचे माजी राज्य कार्यकारिणी सदस्य मनमोहन सिंग सैनी, भाजपाचे विभाग प्रमुख भवानी भीख शुक्ला, भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवलेले उमेदवार योगेंद्र नाथ मिश्रा, आणि केशव पासी यांचा समावेश आहे. या सर्वांनी भाजप सोडून सपामध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान दुसरीकडे अखिलेश यादव यांनी बसपाला देखील धक्का दिला आहे. बसपाच्या अनेक माजी आमदारांनी भाजप नेत्यांसोबतच सपामध्ये प्रवेश केला आहे. ज्यामध्ये माजी आमदार विनय कुराली, बसपाचे माजी जिल्हा महासचीव नरेश प्रताप सिंह, माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सैनी यांच्यासह काही जणांनी सपामध्ये प्रवेश केला आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आल्याचं पहायला मिळत आहे.