Abhijeet Dipke : आता कोर्टाच्या Gen Z विधानामुळे नवं वादळ, अभिजीत दीपकेंची एका ओळीची पोस्ट, मोदींचा फोटो वापरून…
अभिजीत दीपके यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया खात्यावर इंग्रजी भाषेत एक ओळ पोस्ट केली आहे. सोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो पोस्ट केलाय. कॉकरोच जनता पार्टीच्या आपल्या पहिल्या आंदोलनानंतर पंतप्रधान मोदी यांनी इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ पोस्ट केले होते.

CJP Abhijeet Dipke : सीजेपीचे संहसंयोजक आशुतोष रांका आणि सौरभ दास सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्यास बंदी असताना त्यांनी गेटवरून जात या मैदानावर घोषणाबाजी केली होती. या कृत्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कोठडी वाढवण्याचा निर्णयाविरोधात या दोघांनीही दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दखल केली होती. याच याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने ‘तुम्ही जेन झी नाहीत’ अशी टिप्पणी केली आहे. न्यायालयाच्या याच टिप्पणीची आता चर्चा होत आहे. दरम्यान या टिप्पणीनंतर सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टचीही आता सगळीकडे चर्चा होत आहे.
तुम्ही जेन झी नाहीत, कोर्टाची टिप्पणी
स्पेशल एक्झिक्यूटिव्ह मॅजिस्ट्रेटने आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली होती. याच निर्णयाला या दोघांनीही दिल्ली उच्च न्यायालयात याचिकेच्या माध्यमातून आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने दोघांनाही त्यांचे वय विचारले. रांका आणि सौरभ दास यांनी त्यांचे वय सांगितल्यानंतर न्यायालयाने ‘तुम्ही जेन झी नाहीत’ अशी टिप्पणी केली. पुढे या दोघांनीही आपली याचिका मागे घेतली आहे. दरम्यान आता न्यायालयाने ही टिप्पणी केल्यानंतर अभिजीत दीपके यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर एक खास पोस्ट केलीय.
दीपके यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमकं काय आहे?
अभिजीत दीपके यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया खात्यावर इंग्रजी भाषेत एक ओळ पोस्ट केली आहे. सोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो पोस्ट केलाय. कॉकरोच जनता पार्टीच्या आपल्या पहिल्या आंदोलनानंतर पंतप्रधान मोदी यांनी इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ पोस्ट केले होते. या व्हिडीओंच्या माध्यमातून त्यांनी जेन झींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. त्याच व्हिडीओतील एक स्क्रीनशॉट दीपके यांनी पोस्ट केलाय. सोबतच ‘GenZ म्हणून पात्र ठरणारी एकमेव व्यक्ती’ अशा आशयाचं त्यांनी कॅप्शन दिलंय. दीपके यांच्या या कॅप्शनला न्यायालयाच्या ‘तुम्ही जेन झी नाहीत’ या टिप्पणीशी जोडले जात आहे. दरम्यान, आता आशुतोष रांका आणि सौरभ दास यांची सुटका नेमकी कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.