Abhijit Dipke : दोन तरुणींचे आयुष्य बर्बाद… अभिजीत दीपकेंचा धक्कादायक दावा, विधानाने खळबळ

कॉकरोच जनता पार्टीने (CJP) स्वतंत्र भारद्वाज विरोधात तीव्र आंदोलन केले. एका विद्यार्थ्याच्या वडिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. सीजेपीचे संयोजक अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, डीसीपी सचिन शर्मांवर संघी गुंडांना पाठिंबा दिल्याचा आणि दोन तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Abhijit Dipke : दोन तरुणींचे आयुष्य बर्बाद... अभिजीत दीपकेंचा धक्कादायक दावा, विधानाने खळबळ
abhijit dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 04, 2026 | 6:19 PM

कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या नेतृत्वात सीजेपीच्या समर्थकांनी आज जोरदार आंदोलन केलं. या आंदोलकांनी दिल्लीच्या संसद भवन पोलीस ठाण्याच्या समोर एकत्र जमून कथित इन्फ्ल्यूएन्सर स्वतंत्र भारद्वाजच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. एका आंदोलक विद्यार्थ्याच्या वडिलांना मारहाण केल्याचा दावा भारद्वाज याने केला आहे. त्यामुळे भारद्वाज याच्यावर कारवाई करण्यासाठी सीजेपीने आंदोलन केलं. आजाद समाज पार्टी (कांशीराम)चे प्रमुख, खासदार चंद्रशेखर आजाद यांनीही घटनास्थळी जाऊन सीजेपीला साथ दिली.

दुसरीकडे सीजेपीचे संयोजक अभिजीत दीपके यांनी स्वतंत्र भारद्वाज याच्यावर कारवाई करत नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी या प्रकरणात थेट डीसीपी सचिन शर्मा यांनाच घेरलं आहे. शर्मा यांच्यावर संघी गुंडांचं समर्थन करण्याचा आरोप दीपकेंनी लावला आहे. या घटनेनंतर दीपेकेंनी एक्सवर पोस्ट करून सचिन शर्मा यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला आहे. असं करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? असा सवाल करतानाच शर्मा यांच्यावर दोन तरुणींचं आयुष्य बर्बाद केल्याचा आरोपही दीपके यांनी लगावला आहे.

 

ते तुरुंगात का नाही?

दीपके यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. @Delhi Police आणि DCP सचिन शर्मा यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी दोन तरुणींचं आयुष्य बर्बाद करून खाकीचा अपमान केला आहे, असं दीपकेंनी म्हटलंय. तर दुसऱ्या ट्विटमध्ये डीसीपी सचिन शर्मा यांनी संघीय गुंडे आतापर्यंत तुरुंगात का नाहीये, हे सांगितलं पाहिजे. सचिन शर्मा स्वत: कट्टर संघी आहेत म्हणून त्यांना अटक केली नाही का? मला हे तुमच्याच विभागाच्या लोकांनी सांगितलं आहे, असं दीपके यांनी म्हटलं आहे.

चार महिन्यानंतरही मोकळे कसे?

पीडित विद्यार्थीनी निशू आजाद हिच्याबद्दलही त्यांनी लिहिलं आहे. जेव्हा निशूचे वडिलांवर संघीय गुंडांनी हल्ला केला. तेव्हा ती रडत होती. तिने सचिन शर्मा आणि दिल्ली पोलिसांकडे आरोपींना अटक करण्याची वारंवार मागणी केली. दोन महिन्यानंतरही हे आरोपी अजून खुले आम फिरत आहेत. या गुंडांना मदत करणाऱ्या सचिन शर्मांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं होतं. यावेळी कायदा सुव्यवस्था हाताळण्यात अपयश आल्याचं खापर फुटल्याने सचिन शर्मा आधीच वादात सापडलेले आहेत. त्यात आता हा नवीन वाद उभा राहिल्याने शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

स्वतंत्र भारद्वाजच्या एका मुलाखतीमुळे हे सर्व प्रकरण बाहेर आलं आहे. स्वतंत्र भारद्वाज हा स्वत: कट्टर हिंदुत्ववादी मानतो. त्याने आंदोलनाच्या दरम्यान निशू आजाद हिच्या वडिलाचं डोकं फोडल्याचं मान्य केलं आहे. एका मुलाखतीत त्याने हे सांगितलं आहे. या गुन्ह्याला कोणती शिक्षा असते तुम्हाला माहीत आहे का? कलम 307 लागतं. त्यांना 60 टक्के टाके लागले होते. त्या व्यक्तीला गंभीर परिस्थितीत रुग्णालयात नेलं होतं. त्याची मुलगी पोलीस ठाण्याच्या बाहेर उभी होती. न्याय नाही मिळाला तर जीव देईन असं ती म्हणत होती. पण मला तुरुंगातही पाठवलं नाही. हे जगाला कळलं पाहिजे. मी संपूर्ण रात्र बाहेर फिरत होतो, असं स्वतंत्रने मुलाखतीत कबूल केलं आहे. त्यामुळे सीजेपीच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us