सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, शशी थरुर म्हणाले, Thank You!

| Updated on: Aug 18, 2021 | 11:31 AM

काँग्रेस खासदार शशी थरुर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्ली कोर्टाने थरुर यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, शशी थरुर म्हणाले, Thank You!
Shashi Tharoor
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरुर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्ली कोर्टाने थरुर यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. शशी थरुर यांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे. गेल्या साडेसात वर्षापासून मी या त्रासातून जात आहे. मला दोषमुक्त केल्यामुळे मी आपला आभारी आहे, असं शशी थरुर यांनी कोर्टाला सांगितलं.

माजी भारतीय डिप्लोमॅट आणि काँग्रेस नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांच्या पत्नी- प्रसिद्ध उद्योजिका सुनंदा पुष्कर (Sunanda Pushkar) यांचा मृत्यू 17 जानेवारी 2014 रोजी झाला होता. दिल्लीच्या लीला पॅलेसमधील हॉटेल रुममध्ये त्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. आपली पत्नी झोपली असावी, असा समज करुन शशी थरुर यांनी दुर्लक्ष केले. मात्र बराच वेळ त्यांना जाग आली नाही, तेव्हा त्यांना आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचं समजल्याचा दावा केला जातो.

सुनंदा पुष्कर यांनी आत्महत्या केली, की घातपात हा संशय व्यक्त करत पोलिसांनी तपास केला. सुनंदा पुष्कर यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख होता. मात्र ड्रग्ज ओव्हरडोसनंतर पुष्कर यांचा मृत्यू झाला असला, तरी त्यांच्या शरीरावर जखमा असल्याचं एम्सच्या डॉक्टरांनी म्हटलं होतं.

कोण होत्या सुनंदा पुष्कर?

सुनंदा पुष्कर यांचा जन्म 27 जून 1964 रोजी काश्मिरी पंडित कुटुंबात झाला. लेफ्टनंट कर्नल पुष्कर नाथ दास आणि जया दास यांच्या त्या कन्या. हॉटेल मॅनेजमेंट केलेला मित्र संजय रैनासोबत त्यांचा विवाह झाला होता. मात्र 1988 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. पुढच्याच वर्षी त्या दुबईला गेल्या. 1991 मध्ये त्यांनी सुजित मेनन यांच्याशी लग्न केलं. नोव्हेंबर 1992 मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला. मात्र 1997 मध्ये मेनन यांचा अपघाती मृत्यू झाला.

शशी थरुर यांच्याशी तिसरा विवाह

दुसरीकडे, शशी थरुरही 2007 मध्ये कॅनडियन बायको ख्रिस्ता गिल्ससोबत दुबईला आले होते. ऑक्टोबर 2009 मध्ये सुनंदा आणि शशी यांची एका पार्टीत ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 2010 मध्ये दोघंही विवाहबंधनात अडकले. दोघांमध्ये आठ वर्षांचं अंतर होतं. थरुर यांच्या केरळातील गावी मल्ल्याळी पद्धतीने ते लग्नबद्ध झाले. हा दोघांचाही तिसरा विवाह होता. त्याच वर्षी शशी थरुर संसदेवर निवडून गेले.

संबंधित बातम्या   

Sunanda Pushkar | थरुर, तरार आणि थरार! पाकिस्तानी महिला पत्रकारासोबत ट्विटरवॉरच्या दुसऱ्याच दिवशी झालेला सुनंदा पुष्कर यांचा गूढ मृत्यू