
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एका i20 कारमध्ये भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका गंभीर होता यात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला, तर ३० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. सध्या दिल्ली पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून याबद्दलची कसून चौकशी सुरु आहे. त्यातच आता लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार स्फोटाच्या तपासात तपास यंत्रणांना महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळाले आहेत. ज्यामुळे तपासाला गती मिळणार आहे.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट घडवण्यापूर्वी एका संशयित व्यक्तीने ही i20 कार सुनहरी मस्जिद परिसरातील पार्किंगमध्ये उभी केली होती. ही कार दुपारी 3:19 वाजता पार्किंगमध्ये आली. त्यानंतर संध्याकाळी 6:48 वाजता ती बाहेर पडली. साधारण 3 तास 29 मिनिटे ही कार पार्किंगमध्ये उभी होती. कार पार्किंगमध्ये असताना या कारचा चालक कारमधून उतरला नाही.
तपास यंत्रणेच्या मते, हा कारचालक कोणाकडून तरी सूचना मिळण्याची वाट पाहत असावा किंवा कार पार्किंगमध्ये असताना स्फोटक कारमध्ये ठेवण्यात आली असावीत, असा संशय व्यक्त केला जात आहे. कारण पार्किंगमधून बाहेर निघाल्यानंतर अवघ्या चार मिनिटांत (सुमारे 6:52 वाजता) सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलजवळ मोठा स्फोट झाला.
दिल्ली पोलिसांनी जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून कारमधील संशयित व्यक्तीचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. या फोटोच्या आधारे पोलिसांनी संशयिताची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. या तपासात समोर आलेले कारचे कनेक्शन या घटनेमागील दहशतवादी कटाची शक्यता वर्तवली जात आहे. या स्फोटात वापरण्यात आलेली i20 कार जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील एका व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे उघड झाले आहे. या आधारावर दिल्ली पोलिसांची पथके तपास करण्यासाठी जम्मू-काश्मीरला रवाना झाली आहेत.
या संपूर्ण घटनेमागे मोठा कट असल्याचा आणि गैरकायदेशीर हालचालींचा संशय असल्याने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गैरकानूनी गतिविधियां (रोकथाम) अधिनियम (UAPA) च्या कलम 16 (दहशतवादी कृत्य) आणि कलम 18 (कट रचणे) अंतर्गत तसेच विस्फोटक अधिनियम च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेनंतर दिल्लीसह मुंबई आणि इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. या तपासाला कोणताही अडथळा येऊ नये यासाठी लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे गेट-1 आणि गेट-4 पुढील पोलीस सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.