Delhi Blast : 3 तास आधी विमानतळावर या… प्रवाशांना सूचना जारी, मंदिरांना छावणीचे स्वरूप, दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बंदोबस्त वाढला
दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मंदिरे व गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत, तर विमानतळांवर प्रवाशांना किमान 3 तास आधी पोहोचण्याची सूचना देण्यात आली आहे. बॉम्बशोधक पथके सक्रिय असून सुरक्षा तपासणी वाढवण्यात आली आहे.

राजधानी दिल्लीत काल (सोमवार) संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने (Delhi Blast) अख्खा देश हादरला आहे. लाल किल्ल्याजवळच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये संध्याकाळी 7 च्या आसास भीषण स्फोट झाला आणि क्षणात सगळं उद्ध्वस्त झालं. या स्फोटात आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांचा आकाड वाढण्याची भीतीदेखील व्यकत होत आहे. दरम्यान दिल्लीतील जीवघेण्या स्फोटानंतर महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईतही विशेष खरबदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई, पुण्यासह देशातील अनेक प्रमुख शहरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्लीतील स्फोटानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट जारी केला असून राज्यातील महत्वाच्या शहरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आली असून पुणे पोलीस देखील अलर्ट मोडवर आले असून शहरात नाकाबंदी, Lodges चेकिंग,पेट्रोलिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर बीडीडीएस पथकाच्या माध्यमातून संपूर्ण रेल्वे स्टेशनचा परिसर तसेच फलाटांची तपासणी करण्यात येत आहे. लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्यासह डॉग स्कोड, बॉम्ब शोधक पथक यांच्याकडून बॅगची आणि स्थानक परिसराची कसून तपासणी सुरू आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांकडूनही हाय अलर्ट जारी असून पोलिसांकडून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावत नाकाबंदी सुरू आहे. रात्रीच्या सुमारास वाहनांची कसून चौकशी देखील करण्यात आली. तसेच राज्यातील प्रमुख मंदिरांची सुरक्षाही वाढवण्यात आल्याने मंदिरांना छावणीचे स्वरूप आले आहे. प्रत्येक भाविकाची कसून तपासणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात बंदोबस्त वाढला
दिल्लीच्या बॉम्बस्फोटानंतर भुसावळ जळगाव रेल्वे स्टेशन हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्याकडून डॉग स्कॉट शोधक पथक यांच्याकडून प्रवासी वर्गांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच शिर्डीतही पोलिसांची नाकाबंदी आहे. दिल्लीतील भीषण स्फोटानंतर अहिल्यानगर जिल्हा पोलीस अलर्ट मोडवर असून शिर्डी पोलिसांकडून शिर्डी शहरात शिर्डीच्या प्रवेशद्वारासमोर नाकाबंदी सुरू आहे. राज्यभरातून शिर्डीला येणाऱ्या वाहनांची शिर्डी पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. शिर्डीच्या साईदरबारी देश-विदेशातून साईभक्त येत असतात, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिर्डीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहेत.
दिल्लीत स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळांना विशेष अलर्ट
काल संध्याकाळी दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे व गर्दीच्या ठिकाणांना विशेष अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशभरात प्रसिद्ध असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरातही पोलिसांनी विशेष खबरदारी घेत छावणीचा स्वरूप दिलेला आहे. प्रत्येक भाविकाची मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून तपासणी करून आत सोडण्यात येत आहे. तर मंदिर परिसरात शीघ्रकृतिदल व पोलिसांचा मोठा पहारा लावण्यात आलेला आहे. या ठिकाणी सशस्त्र पोलीसही नेमण्यात आले आहेत.
Delhi Red Fort Blast : दिल्ली कार ब्लास्टमध्ये पहिले नाव समोर, कोण आहे नदीम खान?
मुंबईत सुरक्षा यंत्रणा सतर्क
राजधानी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट 9 जणांनी प्राण गमावले. यानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेनंतर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून पोलिसांना अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान दिल्ली स्फोटानंतर मुंबई सीएसटी येथे मोठा पोलीस बंदोबस्त असून सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे. सीएसटी येथे आरपीएफ आणि जीआरपी संयुक्तपणे तपासणी करत आहे . संशयित प्रवाशाची बॅग किंवा वस्तूची डॉग स्क्वॉडमार्फत चौकशी केली जात आहे . कुठलीही अप्रिय घटना होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये , सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करावा , असं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आलं आहे. दिल्लीत संशयास्पद स्फोट झाल्यानंतर मुंबईतील माहीम रेती बंदर जवळ पोलीस अलर्टवर असून सागरी किनाऱ्यावर लक्ष ठेवून आहेत.
दिल्ली ब्लास्ट नंतर मुंबई अलर्ट मोडवर
मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धीविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. या अनुषंगाने मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी तात्काळ सर्व सदस्यांसोबत सुरक्षा आढावा संदर्भात पोलिस प्रशासनांसोबत बातचित केली. येणा-या भाविकांची तपासणी कडक सुरू ठेवण्यात आली आहे. मंदिर परीसरात पोलिस सुरक्षा देखील कडक करण्यात आली.
विमानतळावर 3 तासं आधी पोहोचण्याच्या सूचना
तसेच भारतातील सर्व विमानतळांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. विमान प्रवाश्यांना प्रस्थानाच्या किमान 3 तास आधी विमानतळावर पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षा कारणाने चेक-इन आणि बोर्डिंगसाठी विमानतळावर तीन तास अगोदर पोहोचण्याचे अपील करण्यात आले आहे. विमानतळावर प्रवेश करण्यासाठी , वैध सरकार मान्यताप्राप्त फोटो ओळखपत्रे बाळगा. चेक-इन बॅगेज व्यतिरिक्त,7 किलो वजनाची फक्त 1हँडबॅग घेऊन जाण्याची परवानगी असेल. नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व प्रवाशांना बोर्डिंगपूर्वी दुय्यम सुरक्षा तपासणी करणे आवश्यक असेल अशा सूचना आकासा एयरलाईन्सतर्फे ट्विट करून प्रवाशांना देण्यात आल्या आहेत.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली होती तसेच दिल्लीत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस देखील अलर्टवर मोडवर आलेत . स्टेशन परिसरात आज सायंकाळच्या सुमारास कल्याण पोलिसांचे पथक दाखल झाले . कल्याण स्टेशन परिसरात नाकाबंदी करत वाहनाची ,प्रवाशांची तपासणी केली . सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कल्याण पोलीस अलर्ट मोडवर असल्याचे एसीपी कल्याणजी घेटे यांनी सांगितलं
