गुगल मॅपने पुन्हा एकदा दिला धोका, चुकीचा रस्ता दाखवल्याने थेट नदीत पडली कार

आपण कुठे ही बाहेर निघालो की गुगल मॅपचा आधार घेतोच. गुगल मॅप जसा रस्ता दाखवतो तसं आपण पुढे पुढे जात असतो. पण कधी कधी गुगल मॅपवर डोळे बंद करुन विश्वास ठेवणं महागात देखील पडू शकतं. हैदराबादच्या काही पर्यटकांना याचा अनुभव आला आहे. त्यांची कार थेट नदीत कोसळली आहे.

गुगल मॅपने पुन्हा एकदा दिला धोका, चुकीचा रस्ता दाखवल्याने थेट नदीत पडली कार
| Updated on: May 25, 2024 | 3:47 PM

बाहेर कुठे फिरायला जायचे असेल आणि अनोळखी रस्ता असेल तर अनेक जण गुगल मॅपचा आधार घेतात. गुगल मॅपवर एकदा लोकेशन सेट केले की, गाडी आपण त्या मार्गावरुन घेऊन जात असतो. मात्र गुगल मॅप कधी कधी धोका देखील देतो. कारण अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. हैदराबादमधील पर्यटकांची गाडी गुगल मॅपने सुचवलेल्या मार्गावरुन जात असताना असं करणं त्यांना चांगलेच महागात पडले आहे. कारण त्यांची एसयूव्ही थेट नदीत जाऊन पडलीये. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कुरुपंथारा भागात शनिवारी सकाळी ही घटना घडली. या कारमध्ये तीन पुरुष आणि एक महिला होती. जे अलप्पुझा येथे जात होते.

सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

सुदैवाने या घटनेत कोणत्याही पर्यटकांनाृ दुखापत झाली नाही. पोलीस कर्मचारी व स्थानिक लोकांनी वेळीच धाव घेत त्यांना वाचवले. पण कार नदीत पूर्णपणे बुडाली असून तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कार नदीत पडल्याची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर या पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

गुगल मॅपमध्ये आतापर्यंत अनेकदा त्रुटी दिसल्या आहेत. एकदा तामिळनाडूच्या गुडालूरमध्ये एक कारला पायऱ्यांनी मार्ग दाखवण्यात आला होता. काही जण कर्नाटकात परतत असताना ही घटना घडली. गुगल मॅपद्वारे त्यांनी लोकेशन सेट केल्यानंतर गुगल मॅप त्यांना पाहऱ्यांनी जाणाऱ्या मार्गावर घेऊन आली.

आतापर्यंत अनेक अशा घटना घडल्या आहे. गेल्या वर्षी गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याने दोन डॉक्टरांचा नदीत पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर केरळ पोलिसांनी पावसाळ्यात गुगल मॅपचा वापर करताना सावधगिरी बाळगण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.