सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट अन् धो-धो बरसणार, महाराष्ट्रासह या राज्यांना पाऊस झोडपणार

IMD Weather Alert : हवामान विभागाने शनिवार (30 मे) रोजी देशातील अनेक भागांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोणत्या राज्यात काय परिस्थिती असेल ते जाणून घेऊयात.

सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट अन् धो-धो बरसणार, महाराष्ट्रासह या राज्यांना पाऊस झोडपणार
imd weather update
Image Credit source: Google
| Updated on: May 29, 2026 | 9:55 PM

देशाच्या अनेक भागातील हवामानात वेगाने बदल होते आहे. अशातच आता हवामान विभागाने शनिवार (30 मे) रोजी देशातील अनेक भागांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. खासकरून पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याकाळात ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. काही भागांत गारपीट होण्याचाही अंदाज आहे. यामुळे कमाल तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसपर्यंत घट होन उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशातील हवामानाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काही भागात उष्णतेची लाट येण्याची

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील विदर्भातही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राजस्थान आणि गुजरातमधील काही भागांत उष्णतेची लाट कमी होत असली तरी दिवसाचे तापमान अद्यापही जास्त राहणार आहे. या बदलत्या हवामानाचा शेती कामांवर तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतात पावसाची शक्यता

हवामान विभागाने उद्यासाठी दक्षिण भारतातील तमिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ, लक्षद्वीप आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. किनारपट्टी भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल आणि वादळी वारे वाहतील. या राज्यांमध्ये मान्सूनपूर्व हालचाली सक्रिय झाल्यामुळे पूरस्थिती किंवा पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या पावसामुळे तापमान सामान्यापेक्षा कमी होऊल, मात्र हवेत आर्द्रता अधिक असल्याने उकाडा जाणवू शकतो.

ईशान्य भारतात कसे असेल हवामान?

पूर्व आणि ईशान्य भारतातील बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल तसेच आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये शनिवारी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वारेही वाहतील. ईशान्य भारतात अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिक्कीम आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम भारतातील गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या बऱ्याचशा भागात वातावरण मुख्यतः कोरडे राहील, मात्र आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तापमान सामान्यापेक्षा किंचित जास्त असू शकते. मात्र ज्या भागात पावसाच्या सरी कोसळतील त्या भागात उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us