‘आंदोलनं दाबल्यास नेपाळ-बांगलदेशासारखी परिस्थिती…’ सोनम वांगचुक यांचा सरकारला काय इशारा?
Sonam Wangchuk Warning: पर्यावरण तज्ज्ञ आणि लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारला एक मोठा इशारा दिला आहे. त्यांनी आंदोलनावरून मोदी सरकारला एक सल्लाही दिला आहे.

Sonam Wangchuk Warning: देशात शांततापूर्ण मार्गाने होणाऱ्या आंदोलनांवर बंदी घालणे, त्यांची मुस्काटदाबीवर पर्यावरण तज्ज्ञ आणि लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारला एक मोठा इशारा दिला आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी मोदी सरकारला मोठा सल्ला दिला आहे. जर नागरिकांना, आंदोलकांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करू दिलं नाही, त्यांचा संताप व्यक्त होऊ दिला नाही, तर नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा वांगचुक यांनी दिला आहे.
आंदोलनं ही सरकारसाठी प्रेशर वॉल्व्ह
मुंबईतील IFP महोत्सवात त्यांनी विचार मांडले. लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे, मोर्चा काढणे, निदर्शने करणे हे सरकारला अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरीत करणारी एक प्रकारची प्रेशर वॉल्व्ह आहेत. जेव्हा लोकांची ऊर्जा आणि राग व्यक्त करण्याचे सर्व मार्ग बंद करण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळी उद्रेक वाढतो. मग सत्तापालट आणि जनआक्रोश वाढतो. बांग्लादेश आणि श्रीलंकेतील घडामोडींचा दाखला त्यासाठी त्यांनी दिला. त्यांनी केंद्र सरकारला अशा मुस्काटदाबीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
तर सरकारलाच नुकसान होण्याचा इशारा
दिल्लीतील जंतरमंतर येथे सीजेपी नेत्यांना अटक करण्यात आली. त्यांना तुरूंगात डांबण्यात आले. त्यावर वांगचुक यांनी प्रतिक्रिया दिली. सीजेपी नेते हे जनतेच्या भावनांचे वाहक, एक मॅसेंजर आहेत. त्यांचा मूळ संदेश समजून घ्या. जर सरकार नागरिकांच्या हिताचे काम करत नसेल तर लोक विरोध करतीलच. अशावेळी बळाचा वापर करून लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारसाठी नुकसानकारक ठरेल.
सीमा तरी सुरक्षित करा
अर्धसैनिक दलाच्या आणि शीघ्र कृती दलाच्या तसेच सुरक्षा दलाच्या तुकड्या आपल्याच देशाच्या नागरिकांच्या मागे उभ्या करण्यापेक्षा देशाच्या सीमा सुरक्षित करा असा जबरी टोला सोनम वांगचुक यांनी लगावला. चीनकडून लडाखच्या सीमेवर अतिक्रमण करण्यात येत आहे. ते रोखणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे ते म्हणाले. त्यांनी केंद्र सरकारला आंदोलनावरील दडपशाहीवरून चांगलेच धारेवर धरले.