वादळ, गारपीट अन् मुसळधार; या राज्यांना धोक्याचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी

IMD Rain Alert : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 11 जून रोजी देशातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळणार आहे. अनेक राज्यांना अलर्टही जारी करण्यात आला आहे.

वादळ, गारपीट अन् मुसळधार; या राज्यांना धोक्याचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी
IMD Rain Alert in Many States
Image Credit source: Google
| Updated on: Jun 10, 2026 | 10:47 PM

देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे, त्यामुळे बऱ्याच राज्यांच्या हवामानात बदल झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 11 जून रोजी देशातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळणार आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली तसेच पूर्व आणि पश्चिम राजस्थानमध्ये ताशी 60 ते 70 किमी वेगाने वारे वाहू शकतात. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 80 किमी प्रतितासपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल ते सविस्तर जाणून घेऊयात.

दिल्लीत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता

राजधानी दिल्ली आणि एनसीआर परिसरात दिवसभर आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. संध्याकाळी किंवा रात्री मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह आणि धुळीच्या वादळासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात वाऱ्याचा वेग 50 ते 60 किमी प्रतितास असणार आहे.

उत्तर-पश्चिम भारतासाठी ऑरेंज अलर्ट जारी

पश्चिमी विक्षोभामुळे हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. या राज्यांना पावसाचा आणि गारपीटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांत धुळीचे वादळ येण्याची शक्यता असून हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

ईशान्य आणि पूर्व भारतात मुसळधार पाऊस

अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये काही ठिकाणी 7 ते 20 सेंटीमीटरपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ओडिशामध्येही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय अंदमान-निकोबार बेटे आणि गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगालमध्येही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बिहार आणि झारखंडमध्येही वादळी पावसाची शक्यता

बिहारमध्ये 11 जून रोजी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी आणि ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही भागांत मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. झारखंडमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागांत हलका, तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र 12 आणि 13 जून रोजी झारखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सूनची अपडेट काय?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मान्सूनची उत्तरेकडील सीमा हरनाई, सोलापूर, कलबुर्गी, नंद्याल, चेन्नई, सिलीगुडी आणि 27.5°N/87.5°E या अक्षांश-रेखांशातून जात आहे. पुढील 3 ते 4 दिवसांत मान्सून मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या आणखी काही भागांत पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती आहे. तसेच पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशाच्या काही भागांतही मान्सून पोहोचण्याची दाट शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

Follow Us