भारतातील इंधन दरवाढ जगातील देशांच्या तुलनेत सर्वात कमी, कोणत्या देशात किती दर? वाचा

Fuel Price : भारतात गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ सुरू आहे, मात्र ही इंधन दरवाढ जगातील सर्वात कमी वाढींमध्ये गणली जात आहे. जागतिक पातळीवरील परिस्थिती जाणून घेऊयात.

भारतातील इंधन दरवाढ जगातील देशांच्या तुलनेत सर्वात कमी, कोणत्या देशात किती दर? वाचा
Fuel Price India
Image Credit source: Google
| Updated on: May 25, 2026 | 2:52 PM

नवी दिल्ली : जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातही सातत्याने इंधन दरवाढ होत आहे, मात्र आपल्या देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये झालेली वाढ जागतिक स्तरावर तुलनेने कमी असल्याचे तज्ज्ञांनीही अधोरेखित केले आहे. भारतात झालेली इंधन दरवाढ जगातील सर्वात कमी वाढींमध्ये गणली जात आहे. दोन आठवड्यांत चौथ्यांदा दरवाढ करत सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 2.61 ते 2.71 रुपयांची वाढ करण्यात आली. भारतातील दरवाढ आणि जागतिक पातळीवरील स्थितीची माहिती जाणून घेऊयात.

जागतिक बाजारातील वाढलेले कच्च्या तेलाचे दर, रिफायनिंग मार्जिनवरील दबाव आणि रुपयाचे कमकुवत मूल्य यामुळे आयात खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे इंधन दरवाढ करण्यात आली आहे. 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती, तर 19 मे रोजी 90 पैशांची वाढ झाली. त्यानंतर 23 मे रोजी पेट्रोलमध्ये 87 पैसे आणि डिझेलमध्ये 91 पैशांची वाढ करण्यात आली होती.

पहिल्या अडीच महिन्यांतील परिस्थिती

इराणविरोधातील अमेरिका-इस्रायल हल्ले आणि जागतिक तेल वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे फेब्रुवारी अखेरपासून जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. यामुळे सातत्याने इंधन दरवाढ होत आहे. संघर्षाच्या पहिल्या अडीच महिन्यांत ग्राहकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी इंधन विक्रेत्यांनी पंपावरील दर स्थिर ठेवले होते, असे सरकारने म्हटले आहे.

जागतिक परिस्थिती

28 फेब्रुवारी रोजी होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर 15, 19, 23 आणि 25 मे रोजी झालेल्या OMC सुधारणांपर्यंतच्या 78 दिवसांत भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिले. मात्र जगातील इतर भागांत इंधन दर 10, 20, 50 टक्क्यांनी आणि काही ठिकाणी 90 टक्क्यांपर्यंत वाढले. बहुतेक देशांनी इंधन दर 22 टक्क्यांपासून 100 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. विशेषतः युरोप आणि शेजारी देशांमध्ये किरकोळ इंधन दर अनेकदा प्रति लिटर 150 रुपयांपेक्षा जास्त आहेत. अनुदान नसलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतातील दर सर्वात कमी असल्याचे समोर आले आहे.

विकसित अर्थव्यवस्थांमध्येही दरवाढ

  • जगातील सर्व विकसित अर्थव्यवस्थांमध्ये पेट्रोलचे दर सध्या भारतीय चलनानुसार प्रति लिटर 150 ते 180 रुपयांदरम्यान किंवा त्याहून अधिक आहेत. युरोपमध्ये पेट्रोलचा सरासरी दर 179 रुपये आणि डिझेलचा 184 रुपये प्रति लिटर आहे.
  • भारताचे शेजारी देश पाकिस्तान आणि नेपाळमध्ये कमी उत्पन्न असूनही पेट्रोलचे दर प्रति लिटर 135 रुपयांपेक्षा जास्त आहेत. श्रीलंका, म्यानमार आणि फिलिपाइन्समध्येही पेट्रोलचे दर 130 रुपयांहून अधिक आहेत.
  • भारतापेक्षा कमी दरात पेट्रोल विकणारे देश म्हणजे थेट अनुदान देणारे यूएई, मलेशिया किंवा कमी इंधन कर असलेला अमेरिका. त्यामुळे विकसनशील देशांमध्ये भारत पेट्रोल-डिझेलचे तुलनेने कमी दर कायम ठेवत आहे. युरोपच्या तुलनेत भारतातील दर जवळपास निम्मे आहेत.

इंधन दर कमी करणारा एकमेव देश

दोन मोठ्या ऊर्जा संकटांच्या काळात इंधन दर कमी करणारा भारत हा एकमेव देश असल्याचे सांगितले जात आहे. 2022 मध्ये सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धापासून ते 2026 मधील होर्मुझ संकटापर्यंत जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींनी 1970 नंतरची सर्वात मोठी उसळी घेतली. कच्च्या तेलाचे दर दोन वेळा प्रति बॅरल 120 डॉलरच्या पुढे गेले. जगातील बहुतांश आयात-आधारित अर्थव्यवस्थांनी हा वाढीव खर्च नागरिकांवर टाकला, मात्र भारताने उलट भूमिका घेत चार वर्षांत पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर चार वेळा कमी केले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us