मोठी बातमी! इराणची युद्धातून माघार? अमेरिकेला दिला युद्धविरामाचा प्रस्ताव, ट्रम्प यांची ती अटही मान्य
मोठी बातमी समोर येत आहे, इराणकडून अमेरिकेला आता युद्धविरामाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यामध्ये इराणने अमेरिकेच्या काही अटी मान्य केल्या आहेत, त्यामुळे आता लवकरच युद्धविरामाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

युद्धामुळे मध्य पूर्वेत प्रचंड तणाव वाढला आहे. या युद्धात आतापर्यंत तीनही देशांचं अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एकदा दोनदा युद्धविरामाचा प्रयत्न देखील करण्यात आला, मात्र त्यामध्ये अमेरिकेला यश मिळालं नाही. अमेरिकेनं पाकिस्तानच्या माध्यमातून इराणकडे 15 सुत्री कार्यक्रम पाठवला होता. मात्र इराणने हा प्रस्ताव फेटाळून लावला उलट इराणनेच पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेपुढे पाच अटी ठेवल्या होत्या. या अटी जर मान्य असतील तर युद्धविराम होईल असं इराणने म्हटलं होतं. त्यामधील सर्वात महत्त्वाची अट होती ती म्हणजे आमचं या युद्धात जेवढं नुकसान झालं आहे, त्याची नुकसान भरपाई अमेरिकेनं द्यावी.
मात्र आता या युद्धात मोठा उलटफेर पहायला मिळत आहे, इराणने शुक्रवारी अमेरिकेचं एक लढाऊ विमान F-15 ईगल पाडलं आहे. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र हे सर्व सुरू असतानाच आता इराणकडून अमेरिकेला युद्धविरामाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. इराणचे माजी परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद जरीफ यांनी हा युद्धविरामाचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यांनी हा प्रस्ताव सादर करताना म्हटलं आहे की, जर युद्ध थांबवायचं असेल तर दोन्ही देशांना अमेरिका आणि इराणला काही तडजोडी कराव्या लागतील. सोबतच त्यांनी अमेरिकेला इराणच्या वतीने असा शब्द देखील दिला आहे की, आम्ही अण्वस्त्रे विकसीत करणार नाहीत, तसेच आमच्याकडे असलेला समृद्ध युरेनियमचा साठा मर्यादीत ठेवू, त्याबदल्यात पाश्चिमात्य देशांना इराणवर घातलेले निर्बंध उठवावे लागतील असं जरीफ यांनी म्हटलं आहे, त्यांनी आपल्या या प्रस्तावामध्ये दाहा प्रमुख अटी ठेवल्या आहेत.
या प्रमुख अटींमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, आम्ही भविष्यात अण्वास्त्रे विकसीत करणार नाहीत तसेच आमच्या देशातील समृद्ध युरेनियमचा साठा आम्ही मर्यादीत ठेवू. मात्र त्याबदल्यात अमेरिकेनं इराणवर घातलेले सर्व आर्थिक प्रतिबंध हटवावेत. पाश्चिमात्य देशांनी देखील त्यांचे निर्बंध मागे घ्यावेत. इराणला स्वतंत्रपणे तेलाची निर्यात करण्यास तसेच त्यातून मिळणारे उत्पन्न देशात आणण्यास परवानगी देण्यात यावी. तसेच इराणला अण्वस्त्रे नसलेले अणुकार्यक्रम राबवण्यास परवानगी द्यावी अशा अनेक अटींचा या प्रस्तावामध्ये समावेश आहे. दरम्यान हे युद्धच मुळात आण्विक अस्त्रांच्या मुद्द्यावर सुरू झालं होतं. मात्र आता या प्रस्तावानुसार इराणने अमेरिकेची ही अट मान्य केल्यानं आता हे यु्द्ध थांबण्याची चिन्ह निर्माण झालं आहे.