
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध पेटले आहे. गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू असून इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला करत आहे. इराणनेही अमेरिकेचे लष्कर तळ असलेल्या 13 ठिकाणांवर हल्ला केला. यासोबतच साैदी अरेबिया, दुबई, कतार, कुवेत, इराक यांच्यासह अनेक देशातील तेल प्रकल्पांवर हल्ला केला. महत्वाचा समुद्री मार्गही इराणने बंद केला. ज्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक देशांवर तेलाची आणि गॅसची आणीबाणी लागू झाली. गेल्या काही दिवसांपासून देशात आयात होणारा एलपीजी गॅस पुरवठा खंडित झाला. इराणकडून बंद करण्यात आलेल्या समुद्री मार्गाहूनच भारताला एलपीजीचा पुरवठा होतो. मात्र, तो मार्ग बंद असल्याने मोठा जाम लागला. हेच नाही तर यादरम्यान इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात गॅसच्या प्रकल्पांवरही हल्ला करण्यात आला. ज्यामुळे अनेक देशांनी काही दिवसांकरिता प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला.
देशात पुढील काही दिवस एलपीजी गॅसचा तुटवडा होणार याचे मोठे संकेत असताना आता मोठा धक्कादायक निर्णय घेण्यात आला. मध्य पूर्वेतील युद्धाच्या काळात महागाईने चांगलेच थैमान घातल्याचे बघायला मिळत आहे. त्यामध्येच आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ लागणार आहे. थेट घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमती 60 रूपयांनी वाढल्या आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 115 रूपयांनी वाढ झाली आहे.
नवीन दर आजपासून लागू झाले आहेत, इंडियन ऑइल वेबसाइटवर देखील नवीन दर लागू करण्यात आले आहेत. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग गडद झाले असून त्याचे पडसाद भारतीय बाजारपेठेतही उमटत आहेत. संभाव्य गॅस टंचाई लक्षात घेता केंद्र सरकारने औद्योगिक आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे अनेक गॅस प्लांटमधून नव्या ऑर्डर स्वीकारणे बंद केले असून, दोन दिवसांत व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा परिणाम भारतात दिसणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र, आता या युद्धाचा थेट परिणाम भारतीय लोकांवरही होताना दिसत आहे.