गोहत्येच्या अफवेवरुन यूपीत हिंसाचार, फौजदारासह दोघांचा मृत्यू

| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

लखनौ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये गोहत्येच्या अफवेवरुन झालेल्या दंगलीत पोलीस निरीक्षकाला जीव गमवावा लागलाय. सुबोध कुमार सिंह असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे सुमित नावाच्या व्यक्तीचाही गोळी लागून मृत्यू झालाय. कुटुंबीयांच्या मते, सुमित लग्नाची पत्रिका देण्यासाठी बुलंदशहरमध्ये आला होता. या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चिंगरावटी या […]

गोहत्येच्या अफवेवरुन यूपीत हिंसाचार, फौजदारासह दोघांचा मृत्यू
Follow us on

लखनौ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये गोहत्येच्या अफवेवरुन झालेल्या दंगलीत पोलीस निरीक्षकाला जीव गमवावा लागलाय. सुबोध कुमार सिंह असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे सुमित नावाच्या व्यक्तीचाही गोळी लागून मृत्यू झालाय. कुटुंबीयांच्या मते, सुमित लग्नाची पत्रिका देण्यासाठी बुलंदशहरमध्ये आला होता. या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

चिंगरावटी या भागात सकाळी गावकऱ्यांना गायींची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. हिंदू संघटनांना गोहत्येची सूचना किंवा अफवा मिळाली आणि लोक रस्त्यावर उतरले. घटनास्थळी गेलेल्या लोकांनी गायीची हत्या करताना पाहिलं आणि त्यानंतर गोतस्कर घटनास्थळाहून पळून गेले. यानंतर पोलीस घटनास्थळी आले. पण पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतलं नसल्याचा आरोप आहे. यानंतर गावकऱ्यांच्या सूचनेनंतर हिंदूत्त्ववादी संघटनाही घटनास्थळी पोहोचल्या आणि सर्वांनी मिळून बुलंदशहर हायवे बंद केला.

यानंतर आंदोलनकर्त्यांनी पोलीस चौकीला आग लावली आणि एक डझनपेक्षा जास्त वाहनं आगीच्या हवाली केले. दगडफेक, जाळपोळ आणि गोळीबारात अनेक पोलीस कर्मचारी आणि आंदोलनकर्ते जखमीही झाले. बुलंदशहरमध्ये गोळी लागल्याने एका पोलीस निरीक्षकाचाही मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सुमित नावाच्या व्यक्तीला गोळी लागली, ज्याचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गोरक्षकांनी गोंधळ घातला होता. यासाठी हायवे तब्बल दोन तासांसाठी बंद करण्यात आला आणि यावेळेत पोलिसांसोबत आंदोलनकर्त्यांनी हुज्जतही घातली. या सर्व प्रकारानंतर घटनेला वेगळंच वळण मिळालं आणि दगडफेक सुरु झाली. पोलिसांनी चौकीमध्ये घुसून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, तर आंदोलनकर्ते तिथेही पोहोचले आणि पोलीस चौकीवरही दगडफेक केली.

घटनास्थळी पोहोचलेले पोलीस निरीक्षक सुबोध कुमार आणि त्यांच्या पथकाने जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी हवेत गोळीबार केला. याचवेळी एक गोळी स्थानिक सुमितला लागली, ज्यानंतर जमाव आणखी हिंसक झाला. आंदोलनकर्त्यांनीही गोळी चालवल्याचा आरोप आहे, ज्यात पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला.

या हिंसक आंदोलनानंतर अनेक पोलीस आणि आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत. गोरक्षेच्या नावाखाली उत्तर भारतातील हिंसाचार पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यापूर्वीही अशा अनेक घटना उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये घडल्या आहेत. सध्या पाच राज्यांच्या प्रचारामध्ये व्यस्त असलेले यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतःच्याच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अयशस्वी ठरले आहेत.