सभागृहात दांडी मारणाऱ्या केंद्रीय मंत्र्याला व्यंकय्या नायडूंनी सुनावलं

आवश्यक दस्तावेज संसदेच्या पटलावर ठेवताना कामकाजात नाव असूनही दांडी मारणारे पशुपालन, मत्स्यपालन आणि दुग्धविकास राज्यमंत्री संजीव बालयान यांची व्यंकय्या नायडू यांनी कानउघाडणी केली. मंत्री सभागृहात उपस्थित राहत नसल्यामुळे काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चांगलंच सुनावलं होतं.

सभागृहात दांडी मारणाऱ्या केंद्रीय मंत्र्याला व्यंकय्या नायडूंनी सुनावलं

नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री संजीव बालयान यांना चांगलंच सुनावलं. आवश्यक दस्तावेज संसदेच्या पटलावर ठेवताना कामकाजात नाव असूनही दांडी मारणारे पशुपालन, मत्स्यपालन आणि दुग्धविकास राज्यमंत्री संजीव बालयान यांची व्यंकय्या नायडू यांनी कानउघाडणी केली. मंत्री सभागृहात उपस्थित राहत नसल्यामुळे काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चांगलंच सुनावलं होतं.

सभापती व्यंकय्या नायडू यांनी कामकाजानुसार दस्तावेज पटलावर ठेवताना संजीव बालयान यांचं नाव पुकारलं. बालयान यांनी दस्तावेज पटलावर ठेवले. कामकाजात नाव असूनही तुम्ही हजर का नव्हते, अशी विचारणा व्यंकय्या नायडू यांनी केली. मंत्रीजी कृपया लक्ष द्या, भविष्यात असं व्हायला नको, अशी सूचनाही त्यांनी केली. बालयान यांनी यावर माफी मागत भविष्यात असं होणार नाही आणि काळजी घेऊ, अशी ग्वाही दिली.

पंतप्रधान मोदींकडूनही मंत्र्यांना तंबी

सध्या संसदेचं काम मध्यरात्रीपर्यंत चालत आहे. सर्व विषय प्रभावीपणे मार्गी लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः लक्ष घालत आहेत. पण सभागृहात दांडी मारणारे खासदार आणि मंत्री यांना मोदींनी इशारा दिला होता. जे मंत्री रोस्टर ड्युटी पूर्ण करत नाहीत, त्यांची यादी माझ्याकडे द्या, असं मोदींनी भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत म्हटलं होतं. संसदेत विरोधकांकडून मंत्र्यांना प्रश्न विचारले जातात. पण यावेळी मंत्री उपस्थित नसतात आणि त्यामुळे विरोधक मोदींना पत्र लिहून नाराजी कळवतात. यामुळेच मोदींनी मंत्र्यांना स्पष्ट शब्दात आदेश दिला होता.

लोकसभेच्या कामाकाजाने सर्व विक्रम मोडित

मोदी सरकारने आपल्या पहिल्याच अधिवेशनाच्या कामकाजात गेल्या 20 वर्षांचे विक्रम मोडित काढले आहेत. गुरुवारी अर्थसंकल्प विधेयक पारित केल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी ही माहिती दिली आणि समाधान व्यक्त केलं. लोकसभेत गुरुवारपर्यंतच 128 टक्के काम झाल्याचं त्यांनी सांगितलं. तर राज्यसभेचं कामकाज 98 टक्के झालं आहे. संसदेचं हे अधिवेशन 26 जुलैपर्यंत सुरु राहणार असल्यामुळे आणखी काम होण्याची अपेक्षा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *