सीजेपीचा नवा नंबर एक शत्रू… स्वतंत्र भारद्वाज नेमका कोण? काय आहेत आरोप?
स्वतंत्र भारद्वाज, एक हिंदुत्ववादी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, आपल्या मुस्लिमविरोधी आणि वादग्रस्त दाव्यांमुळे चर्चेत आहे. "मुस्लिम जवळून गेले तरी उलटी येते" अशा विधानांमुळे कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) ने त्याला नंबर १ चा शत्रू घोषित केले आहे. सीजेपीने निशू आझादच्या वडिलांवर हल्ला केल्याच्या कबुलीवरून दिल्ली पोलिसांकडून त्याच्या अटकेची आणि खूनाच्या प्रयत्नाची मागणी केली आहे, ज्यामुळे हे प्रकरण अधिक तापले आहे.

who is Swatantra Chardwaj : कॉकरोच जनता पार्टी आणि सरकार दरम्यान तडजोड झाल्यानंतर पुन्हा एकदा जंतरमंतरवरील आंदोलक दिल्ली पोलिसांवर भडकले आहेत. स्वतंत्र भारद्वाज नावाच्या व्यक्तीने केलेल्या दाव्यामुळे सीजेपीने त्याला आपला नंबर वन टार्गेट केलं आहे. स्वतंत्र भारद्वाजला अटक करण्यात यावी म्हणून सीजेपीने दिल्ली पोलिसांवर दबाव वाढवला आहे. सीजेपीचे सहसंयोजक सौरभ दास आणि आशुतोष रांका हे त्याला अटक करावी म्हणून संसद भवन मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. ज्याला चक्क सीजेपीने नंबर वनचा शत्रू मानला तो स्वतंत्र भारद्वाज नेमका आहे तरी कोण? तो एवढा चर्चेत का आला?
स्वतंत्र भारद्वाज बिहारच्या दरभंगा येथील रहिवाशी आहे. गेल्या काही वर्षापासून दिल्लीत राहत आहे. त्याने दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. दिल्लीत येण्यापूर्वी काही दिवस त्याने पटणात शिक्षण घेतलं होतं. हिंदुत्त्ववादी मुद्द्यांवर काम करतानाच तो स्वत:ला सोशल मीडिया इन्फ्लुन्सरही मानतो. त्याने तो गोरक्षक असल्याचंही म्हटलं आहे. सध्या आर्थिक निकषावर आरक्षण असलं पाहिजे, ही मागणी त्याने लावून धरली आहे. त्यामुळे तो अधिक चर्चेत आला आहे.
मुसलमान जवळून गेला तरी…
भारद्वाजने त्याच्या परिचयात त्याची स्वत:ची माहिती दिली आहे. मी दरभंगाचा मैथिल ब्राह्मण आहे. मी पटना विद्यापीठातून शिक्षण घेत होतो. तेव्हा तिथे एका व्यक्तीने भगवा झेंडा जाळला होता. त्यावेळी मी पहिल्यांदा आंदोलन केलं होतं. त्यानंतर माझं आंदोलनाकडे सारखं मन धावू लागलं. आंदोलन करण्यात मजा येत होती. त्यानंतर मी दिल्ली विद्यापीठात दाखल झालो. त्यावेळी श्रद्धाचे 36 तुकडे करण्यात आले होते. त्यामुळे माझा प्लॅटफॉर्म बदलला. मी तेव्हा असं काही बोललो ते 8 मिलियनवर गेलं. त्यावेळी लोक मला वारंवार प्रत्येक टॉपिकवर बोलायला सांगू लागले. मी जेएनयूलाही घेराव घातला होता. तेव्हा मला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर अटक आणि ताब्यात घेण्याचा सिलसिला सुरू झाला. लोकांच्या समोर माझी मुस्लिम विरोधी प्रतिमा तयार झाली. लोकांना अशाच गोष्टी आवडतात. त्यांना प्रेम, करुणेची भाषा समजत नाही. मुस्लिमांची चूक असो वा नसो, पण एखादा मुस्लिम माझ्यापासून जात असताना मला उलटी होते. मला एक दोन नाही, सर्वच मुस्लिमांचा द्वेष आहे. असं का? याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. पण द्वेष आहे, असं स्वतंत्रने त्याच्या बायोमध्ये लिहिलं आहे.
सीजेपीच्या टार्गेटवर का?
सीजेपीने स्वतंत्र भारद्वाजच्या विरोधात आंदोलन दंड थोपाटले आहेत. सीजेपीने त्याला अटक करण्याची आणि त्याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही सीजेपीने केली आहे. मी इन्फ्लूएन्सर निशू आजादच्या वडिलांचं डोकं फोडलं होतं, अशी कबुली त्याने एका यूट्यूबच्या मुलाखतीत दिली होती. भाजपच्या एका बड्या नेत्याला तो मोठ्या भावासारखा मानतो. त्यामुळेच त्याला पोलिसांनी अटक केली नसल्याचं त्याचं म्हणणं आहे. त्याने कबुली दिल्यानंतर सीजेपी अधिक आक्रमक झाली आहे. जो व्यक्ती स्वत: कबुली देतो, गुन्हा मान्य करतो, त्याच्यावर दिल्ली पोलीस कारवाई करत नाहीये, असं सीजेपीने म्हटलंय. तर संजयच्या डोक्याला दुखापत झाल्याचं वृत्त खोटं असल्याचं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे. आरोपीने कड्याने त्याच्या डोक्याला मार दिला होता. ही जखम सामान्य असल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये स्पष्ट झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
मुस्लिम द्वेष
एका मुलाखतीत त्याने मोदी सरकारचा समर्थक असल्याचं मान्य केलं आहे. पण आरक्षण आणि यूजीसीच्या मुद्द्यांवर सरकारच्या धोरणांच्या विरोधात असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. त्याने एका मुलाखतीत मुस्लिमांविरोधातही गरळ ओकली आहे. मुस्लिमांचा द्वेष करणारा असल्याचंही तो सांगतो. मुस्लिमांना पाहून मला उल्टी होते. मला मुल्ला मुक्त भारत बनवायचा आहे. संधी मिळाली तर मुल्ला मुक्त भारत पार्टीची स्थापना करणार असल्याचं त्याने म्हटलंय.