Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का, पश्चिम बंगालमध्ये खेला होबे

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. मात्र आता त्यांना मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमधून मोठी बातमी समोर येत आहे.

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का, पश्चिम बंगालमध्ये खेला होबे
mamata banerjee
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 07, 2026 | 9:07 PM

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने यावेळी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र या निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते, तसेच त्यांनी आपला राजीनामा देण्यास देखील नकार दिला होता. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळून देखील सत्तास्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर आता पश्चिम बंगालचे राज्यपाल ॲक्शन मोडवर आल्याचं पहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी राज्याचं मंत्रिमंडळ बरखास्त केलं आहे. हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

संविधानातील तरतुदीनुसार विधानसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये 8 मे 2021 ते 7 मे 2026 पर्यंत विधानसभा अस्तित्वात होती. मात्र आता पूर्वीच्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे राज्यपालांनी मंत्रिमंडळ बरखास्त केलं आहे. राज्यापालांच्या या निर्णयामुळे आता ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देखील देण्याची गरज नाहीये. पश्चिम बंगालमध्ये यावेळच्या निवडणुकीमध्ये भाजपने तृणमूलला मोठा धक्का दिला आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

दरम्यान निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर 6 मे रोजी ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. तसेच त्यांनी भाजपवर आरोप देखील केले होते. भाजपला हे जनमत मिळालेलं नाहीये, तर भाजपने षडयंत्र रचून हा विजय मिळवला असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं. सोबतच भाजपविरोधात रस्त्यावर उतरून लढण्याची तयारी देखील दाखवली होती, तसेच त्यांनी यावेळी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा देखील संकल्प केला होता. मात्र आता राज्यपालांकडून पश्चिम बंगालचं मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आलं आहे.

निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार 

दरम्यान निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळून आल्याचं पहायला मिळत आहे. बुधवारी रात्री भाजपचे जेष्ठ नेते सुवेंदु अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर राज्यातील वातावरण आता आणखी तापलं आहे.

 

Follow Us