
अनेकांना झोपण्याआधी अंघोळ करण्याची किंवा सकाळी काही नाश्ता करून मग थोड्यावेळाने अंघोळ करण्याची सवय असते. पण काहीजण कधी कधी काही कारणास्तव खाल्ल्यानंतर किंवा जेवल्यानंतर अगदी 5 ते 7 मिनीटांनंतर लगेच अंघोळीला जातात. पण तसे करणे आरोग्यासाठी योग्य नाही. त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. यामागील नक्की कारण काय आहे माहित आहे का? चला जाणून घेऊयात.
पोषणतज्ज्ञांनी काय सांगितलं?
एक पोषणतज्ज्ञ लिमा महाजन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये आणि त्याचे तोटे काय आहेत याबद्दल सांगितलं आहे. तसेच जेवणानंतर किती वेळाने आंघोळ करणे योग्य ठरेल हे देखील त्यांनी व्हिडीओत सांगितलं आहे.
जेवणानंतर लगेच आंघोळ केल्याने तुमच्या पचनसंस्थेला हानी पोहोचू शकते
व्हिडिओमध्ये, लिमा महाजन स्पष्ट करतात की, जेवणानंतर लगेच आंघोळ केल्याने तुमच्या पचनसंस्थेला हानी पोहोचू शकते. त्याचा तुमच्या आरोग्यावर आणि उर्जेवर थेट परिणाम होतो. खरं तर, अन्न खाल्ल्यानंतर आपले शरीर अन्न पचवण्यासाठी जास्त मेहनत करते. यावेळी, शरीरातील जास्त रक्त आपलं पोट आणि पचनसंस्थांकडे जाते जेणेकरून अन्न योग्यरित्या पचवता येईल. जर तुम्ही या वेळी आंघोळ केली तर पाण्याचे तापमान शरीराचे संतुलन बिघडवते.
जेवणानंतर लगेच आंघोळ केल्याने काय होते?
लिमा स्पष्ट करतात की, गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान वाढते. यामुळे त्वचेकडे आणि इतर भागांकडे रक्तप्रवाह वाढतो आणि पोटात कमी रक्त येते. परिणामी, पचनक्रिया मंदावते आणि गॅस किंवा जडपणा जाणवू शकतो. दुसरीकडे, थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्तवाहिन्या रुंद होतात, ज्यामुळे त्वचेकडे रक्तप्रवाह वाढतो आणि पचनक्रियेवर पुन्हा परिणाम होतो. यामुळे अपचन, पोट फुगणे, गॅस किंवा अस्वस्थता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, पोषणज्ज्ञ लिमा महाजन जेवणानंतर लगेच आंघोळ न करण्याचा सल्ला दिला आहे.
दोघांमध्ये 20 ते 25 मिनिटांचं अंतर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवा
मग जर तुम्हाला अंघोळ करायचीच असेल आणि त्याआधी तुम्हा काही खाल्ल असेल तर जेवणानंतर सुमारे 20 मिनिटे हलके फिरा. यामुळे पोट आणि आतड्यांमध्ये अन्न सहजतेने हलण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठता किंवा अपचन यासारख्या समस्या कमी होतात. तेसच तुम्हाला शक्य असल्यास,10 ते 15 मिनिटे वज्रासनात बसणे देखील फायदेशीर आहे. हे योगासन नैसर्गिक पद्धतीने पचनक्रिया सुधारते. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी तुम्ही आंघोळ करू शकता. म्हणजे जेवणानंतर अंघोळ करायची असेल तर दोंन्ही क्रियांमध्ये किमान 20 ते 25 मिनिटांचं अंतर ठेवा.
या दिसताना फार छोट्या सवयी दिसत असल्या तरी त्यांचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. म्हणून जेवल्यानंतर आंघोळ करणे एकतर टाळा. किंवा करायचीच असेल तर किमान 20 ते 25 मिनिटांचे अंतर ठेवा, त्याहीपेक्षा जास्त अंतर ठेवता आले तर अति उत्तम.